HOME   लातूर न्यूज

सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्चच्या नूतन वास्तूचे

ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते उदघाटन


सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्चच्या नूतन वास्तूचे

लातूर: मागच्या एक तपापासून मानसिक रुग्णांच्या सेवेत असणाऱ्या मराठवाड्यातील अग्रगण्य अशा सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ & रिसर्च व अंतरंग व्यसनमुक्ती केंद्राच्या अद्यावत सोयी सुविधांनी परिपूर्ण अशा नूतन वास्तूचे उद्घाटन गुरुवार ०५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ख्यातनाम मनोविकार व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती या केंद्राचे संचालक डॉ. मिलिंद पोतदार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. अशोकराव कुकडे हे राहणार आहेत. आतापर्यंत सावली मानसोपचार रुग्णालयाच्या माध्यमातून केवळ लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या मनोरुग्णांना दर्जेदार मानसोपचार सुविधांची उपलब्धी करून दिली जात होती असे सांगून डॉ. मिलिंद पोतदार म्हणाले की, मागच्या बारा वर्षांच्या कालावधीत सावली मानसोपचार रुग्णालयाच्या माध्यमातून आपण मनोरुग्णांना अत्यंत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. तब्बल एक तप आपले हॉस्पिटल देशिकेंद्र विद्यालयाजवळील जागेत चालवल्या नंतर त्याचे स्थलांतर येत्या ५ जुलै नंतर सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा भव्य नूतन वास्तूत, सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्च नावाने केले जाणार आहे. मानसिक आजारांसोबतच मानसिक आरोग्याच्या सर्वच पैलूंशी निगडित सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने रुग्णालयाचे नवे नामकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लातूर शहरातील अंबाजोगाई रोड वरील पार्थ हॉटेल व अजिंक्य मेगा सिटीच्या पाठीमागे नूतन वास्तू उभारण्यात आली आहे. हे केंद्र मराठवाड्यातील औरंगाबाद नंतरचे मानसिक आरोग्यविषयक सेवा देणारे सर्वात मोठे केंद्र ठरणार आहे. याठिकाणी ३० खाटांची आंतर रुग्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 'स्वर' लातूर या स्वयंसेवी संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंतरंग व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून ५० खाटांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत आपण १ हजार २२ व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार केले असून त्यापैकी ३०० व्यसनी व्यक्ती आजमितीस पूर्णपणे व्यसनांपासून परावृत्त झाल्या आहेत. आजघडीला व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यामुळे मनोरुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. अशा सर्व प्रकारच्या मनोरुग्णांवर मानसिक आजारांवर या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत. केवळ एवढेच नव्हे तर विविध कारणांनी ताणतणावात असलेल्या व्यक्तींसाठी मानसोपचार व समुपदेशन सुविधा, आयक्यु टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट सह मानसिक आजारांच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर चाचण्या, रिलॅक्सेशन थेरपी, बिहेविअर थेरपी, मानसिक आजारी रुग्णांसाठी डे केअर सेंटर, बाल मानसोपचार विभाग, ताणतणाव नियोजन, परीक्षा तणावाचे व्यवस्थापन, प्रभावी पालकत्व आदी विषयावरील कार्यशाळा आदी सर्व सुविधा या केंद्राच्या माध्यमातून एकत्रितपणे पुरविल्या जाणार आहेत. यावेळी डॉ. पोतदार यांनी आत्महत्या करण्यामागची मानसिक स्थिती याबद्दलही अभ्यासपूर्ण विवेचन केले. आपल्या या केंद्राच्या माध्यमातून भविष्यात प्रशिक्षण केंद्रही सुरु करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या मानाने मानसोपचार तज्ज्ञांची संख्या अत्यंत कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या या अद्यावत सोयी सुविधांनी परिपूर्ण अशा रुग्णालयात मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक, वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित मदतनीस रुग्णांच्या सेवेत उपलब्ध असणार आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता दगडोजीराव देशमुख सभागृहात डॉ. आनंद नाडकर्णी यांची मानसिक आरोग्याचे विविध पैलू उलगडून दाखविणारी 'शोध मनाचा, वेध मानसिक आरोग्याचा' या विषयांवरील प्रदीर्घ मुलाखत होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना निमंत्रितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केंद्राचे प्रमुख डॉ. मिलिंद पोतदार, अंतरंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या व्यवस्थापिका सौ. मुग्धा पोतदार यांनी केले आहे.


Comments

Top