लातूर: जिल्हा परिषद सदस्य तथा लातूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी जिल्हापरिषदेच्या एकुर्गा, अंकोली, भोयरा या शाळांची बाल दिनाचे औचित्य साधून स्वतः थकीत वीज बिले भरून वीज पुरवठा सुरू करून दिला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित शाळांच्या आणखी काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी धीरज देशमुख यांनी या तिन्ही शाळांना भेटी दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांच्याशी मुक्तपणे गप्पा मारत जिवनातील अनेक गोष्टी बाबत मार्गदर्शन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी यावेळी धीरज देशमुख यांची मुलाखत घेऊन त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेतल्या. धीरज देशमुख यांनी भरवलेली ही अनोखी पाठशाला सर्वानाच मोहित करून गेली. विद्यार्थ्यांच्या विनंती वरून धीरज देशमुख यांनी मुलांसोबत खो-खो हा खेळही खेळला. मुलांनी शालेय जिवनापासूनच खेळाकडे लक्ष द्यायला हवे असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
Comments