HOME   लातूर न्यूज

गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे

सजावटीसाठी प्लास्टीक, थर्माकोलचा वापर टाळावा, मोठ्या गणपतीचे विसर्जन करु नका


गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे

लातूर ,दि. १४ : पर्यावरणाचा वाढता असमतोल संपूर्ण सजीव सृष्टीसाठी नुकसानकारक ठरत आहे. गणेशोत्सवांसारख्या सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ह्रास होतो. त्यामुळे नेहमीच विधायक कार्यांना अग्रस्थान देणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी लातूरचा यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक रित्या साजरा करावा, असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी केले.
लातूर येथील मध्यवर्ती सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, अडी- अडचणींची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करीत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष अशोक गोविंदपूरकर हे होते. यावेळी लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर हेही उपस्थित होते होते, मध्यवर्ती सार्वजनिक गणेश मंडळाचे सचिव बसवंतप्पा भरडे, उदय गवारे, मोहन माने आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनात धर्मादाय आयुक्त डिगे पुढे म्हणाले की, गणेशोत्सवा दरम्यान मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शोभेच्या वस्तूसाठी कोणत्याही प्रकारचे प्लास्टिकचे साहित्य वापरले जाणार नाही, याची खबरदारी बाळगावी. कारण शोभेसाठी प्लास्टिकच्या वस्तू उपयोगात आणल्याने पुन्हा ते पर्यावरणास बाधक ठरणार आहे. गणेशोत्सव उत्साहात साजरा केल्यानंतर होणाऱ्या विसर्जना दरम्यानही तीन फूट उंचीच्या गणेशमूर्तींचे प्रत्यक्ष विसर्जन न करता प्रतिकात्मक विसर्जन करून त्या मूर्ती स्थापित करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून गणेशमूर्तीला सुशोभित करण्यासाठी वापरलेल्या विविध रंगांमुळे पाण्यातील जलचरांच्या जीवाला धोका पोहचू शकतो. तसेच पाण्यात विषारी रंगाचे घटक मिसळले गेल्याने ते पाणी मनुष्य, प्राण्यांनाही पिण्यासाठी उपयोगी पडू शकत नाही. गणेश मंडळांनी मागच्या वर्षी धर्मादाय कार्यालयाच्या सूचनांचा आदर करून अवांतर खर्चाला बगल देऊन रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे अभियान यशस्वीरीत्या राबविले होते. त्याच धर्तीवर यावर्षी वसतिगृह व पशुसंवर्धनासाठी पुरेपूर योगदान द्यावे, अशी अपेक्षाही शिवकुमार डिगे यांनी व्यक्त केली. मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर यांनी यावेळी बोलतांना मनपाकडे आतापर्यंत २४७ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंद असून त्यात येणाऱ्या काळात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. मनपाच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी देतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत, यासाठी मनपा प्रशासन तत्पर असेल. गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. नाहक खर्च टाळून आपआपले वॉर्ड - परिसर सुशोभित करण्यास मंडळांनी प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


Comments

Top