HOME   लातूर न्यूज

१५ डिसेंबरपर्यंत लातूर खड्डेमुक्त- चंद्रकांत पाटील

चांगली कामे करणार्‍या अधिकार्‍यांचा गौरव, न करणार्‍यांना शासन!


१५ डिसेंबरपर्यंत लातूर खड्डेमुक्त- चंद्रकांत पाटील

लातूर: सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यात पुढील दोन वर्षात ३८ हजार ५०० किलोमीटरची रस्त्यांची कामे पूर्ण करणार असून लातूर जिल्हा १५ डिसेंबरपर्यंत ख्ड्डेमुक्त होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लातूर येथे दिली. लातूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील बोलत होते. यावेळी कामगार कल्याण, कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातुरे, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मुकुंद सुरकुटवार, अधिक्षक अभियंता एडी कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरसिंह भंडे, केआर पाटील, एमएम पाटील यांच्यासह उपअभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील म्हणाले की, राज्यातील २२ हजार किलोमीटरचे रस्ते हे राष्ट्रीय महामार्गांतर्गत येत असून त्याकरिता केंद्र शासनाकडून ०१ लाख ०६ हजार कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षाच्या काळात राज्यात एकूण ३८ हजार ५०० किलो मीटरची रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ता निर्मीतीसाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून जेट पॅचर मशिन हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगून पुढील काळात प्रती दिन एक किलोमीटरचा रस्ता बनवणार्‍या मशीनचा वापर करण्यात येईल.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांनी बांधकाम विभागातील अधिकार्‍यांसमवेत मुक्तपणे संवाद साधून चांगली कामे करणार्‍या अधिकार्‍यांचा गौरव तर काम न करणार्‍या अधिकार्‍यांना शासन केले जाईल, असे सांगितले. अधिक्षक अभियंता कुलकर्णी यांनी पॉवर पॉईट प्रेझेन्टेशनद्वारे लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांची माहिती देऊन राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय रस्त्यांची माहिती दिली.


Comments

Top