लातूर: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपायी यांच्या जाण्याने देशाने सत्शील राजकारणी आणि वास्तवाची जाण असणारा थोर लोकनेता गमावला आहे अशा शब्दात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी दु:ख व्यक्त केले आहे. देशाच्या राजकीय पटलावर कायमचा ठसा उमटविणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये अटलजींचे स्थान मोठे होते. आपल्या विचांरांशी ते शेवटपर्यंत एकनिष्ठ राहीले. सरळ, साध्या स्वभावाचे अटलजी प्रसंगी अतिशय कठोर होत. साहित्य, कला आणि काव्यशास्त्र यांचा त्यांना व्यासंग होता. त्यांच्या अनेक कवितांमधून त्यांच्यातील संवेदनशीलता प्रकट झाली आहे. श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची जबरदस्त ताकद त्यांच्याकडे होती. अनेक कठिण प्रसंगी त्यांच्या मुत्सद्देगिरीचे दर्शन घडले.
विरोधी विचारांचाही आदर करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे सर्व राजकीय पक्षात त्यांनी चाहते निर्माण केले. प्रखर राष्ट्रवादी विचार रुजविण्याबाबत ते नेहमीच आग्रही असत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य दीर्घकाळ स्मरणात राहील असेही आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
Comments