लातूर: वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने 'से नो टू प्लास्टिक' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांर्गत सुमारे ३००० हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. 'प्लास्टिकमुक्त लातूर' साठी जनजागृती व्हावी या हेतूने गुरुवारी कापडी पिशवीचा वापर करणाऱ्या लातुरातील व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पर्यावरण दृष्टीकोनातून हानिकारक असलेल्या प्लास्टिकचा वापर बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही बंदी यशस्वी करण्यासाठी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठी जनजागृती म्हणून वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने 'प्लास्टिक कॅरीबॅगमुक्त लातूर' हे अभियान गेल्या वर्षभरापासून लातुरात राबविले जात आहे. या अभियानअंतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असून, स्वखर्चातून सुमारे ३००० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप नागरिकांना करण्यात आले, अशी माहिती वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांनी दिली.
लातुरातील जे व्यापारी कायम कापडी पिशवीचा वापर करतात अशा व्यापारी बांधवांचा सत्कार वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक सहसचिव अमर साखरे, जिल्हाध्यक्ष नागेश जाधव, श्रीकांत क्षीरसागर, सचिन पवार, अभिजित गायकवाड, हनुमान नावंदर सुभाष मुंढे यांची उपस्थिती होती. येत्या काळात 'वसुंधरा प्रतिष्ठान'च्या वतीने आणखी व्यापक पद्धतीने 'प्लास्टिकमुक्त' अभियान राबविले जाणार आहे.
Comments