HOME   लातूर न्यूज

शेतकऱ्यांना अच्छे दिन- पाशा पटेल

जानेवारीपर्यंत सोयाबीन जाईल ३२०० रुपयांपर्यंत


शेतकऱ्यांना अच्छे दिन- पाशा पटेल

उदगीर: अनुभवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजारातील परिस्थिती शासनापर्यंत पोहचवून शेतकऱ्यांसाठी हिताचे निर्णय घेण्यात महत्वाची भूमिका पार पाडली, आयात व निर्यात धोरणात मोदी सरकारने केलेले अमूलाग्र बदल शेतकरी आणि शेतीवर आधारित उद्योगांना पोषक असून अच्छे दिन आलेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असे मत महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले. उदगीर येथे मराठवाडा जनता विकास परिषद यांच्या मार्फत बुधवारी रघुकुल मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यान व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील होते, तर व्यासपीठावर प्रा डॉ अनिल भिकाने, रमेश अंबरखाने, प्राचार्य डॉ पीई विभूते, विजय चिल्लरगे यांची प्रमुख उपस्थिती होती, प्रारंभी उदगीर शहर व तालुक्यातील उत्तम कार्य केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला, या वेळी ‘कृषी मूल्य आयोग व शेतकरी’ या विषयावर बोलताना पाशा पटेल यांनी विविध काळातील व शासनातील आयात, निर्यात व शेतकरी विषयक निर्णय आणि त्याचे बाजारपेठेवर पडलेले परिणाम याचे दाखले दिले. यंदा सोयाबीनचा १४ लाख हेक्टर पेरा कमी झाला असून कापूस पेरा वाढला आहे, भारतातील तेल उत्पादन करणारे कारखाने बंद पडू लागले आहेत, १९८४
मध्ये भारत खाद्यतेल निर्मितीत स्वयंपूर्ण होता मात्र त्यानंतर सरकारच्या बदलत्या आयात निर्यात धोरणाने २००४ मध्ये ०९ हजार कोटी तेल तर यंदा ७६ हजार कोटी तेल आयात करण्याची वेळ आली, देशातील पहिला कृषी मूल्य आयोग माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या काळात स्थापन करण्यात आला, ४० वर्षात रिफाइंड व क्रूड पाम तेल आयात मूल्य बाबतीत झालेले चढ उतार तसेच सोयाबीन, मूग, उडीद, गहू आणि तूर आयात धोरण याचा अभ्यास करून राज्य मूल्य आयोगाचा अध्यक्ष झाल्यावर मी काही सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सुचनांना निर्णयात बदलून शेतकरी व शेतीवर आधारित उद्योगांच्या हिताची वाटचाल सुरु केली आहे, सोयाबीनच्या पेंडीची किंमत वाढली त्यातून हमीभाव वाढत असून जानेवारी पर्यंत सोयाबीनचा भाव ३२०० रुपयांपर्यंत जाईल, आता पर्यंत ग्राहक धार्जिणे सरकार होते आता शेतकरी धार्जिणे सरकार सत्तेत आहे असे मत पटेल यांनी व्यक्त केले, काळ्या मातीत कष्ट करणाऱ्याला माणूस म्हणून सन्मान मिळवून देणार आणि उद्योजकांचा विकास करून विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अविरत कार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली, प्रास्ताविक प्रा एसएस पाटील यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर व अनिता यलमटे यांनी केले तर आभार महादेव खताळ यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद पत्की, प्रवीण जाहुरे, संजय मुडपे आदींनी पुढाकार घेतला.


Comments

Top