लातूर: शिवछत्रपती शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रातील सर्व शाखांमध्ये उत्तुंग भरारी मारून यश प्राप्त केले आहे. आपल्या कार्याने शिक्षण क्षेत्रात आदर्श अशी शिक्षण व्यवस्था निर्माण केली आहे. मराठवाडयासारख्या मागासलेल्या भागात केलेले शैक्षणिक कार्य नेत्रदिपक आहे, यामध्ये संस्थाध्यक्ष माजी खासदार डॉ.गोपाळराव पाटील व माजी प्राचार्य अनिरूदध जाधव यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा पद्म पुरस्काराने गौरव व्हायला हवा असे मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले.
राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन आमदार अमित देशमुख बोलत होते.
शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी देशभरातल्या नामवंत शैक्षणिक, वैद्यकीय, इंजिनीअरीग क्षेत्राबरोबरच प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात चांगल्या पध्दतीने कामगिरी बजावतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
शाहू महाविद्यालय डीजीटल क्लाससाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
७० वर्षापूर्वी आपण लोकशाही स्विकारली. राजकारण्यांनी सामाजिक, राजकीय, नितीमुल्याची जपणूक केली म्हणूनच लोकशाही टिकून राहिली. देशाच्या उन्नतीमध्ये अनेकांचे योगदान आहे. आपली लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. लोकशाहीच्या माध्यमातून भारत देशाचा सामाजिक आर्थिक स्तर जगात उंचावला. लोकशाहीच्या मार्गाने सत्ता परिवर्तन होत असते मात्र या परिवर्तनात विकासाची प्रक्रिया निरंतर असली पाहिजे असेही ते म्हणाले.
राजकारणाच्या माध्यमातून जनतेने टाकलेला विश्वास विलासराव देशमुखांनी सार्थ ठरवला. लातुरच्या मातीमध्येच सुसंस्कृतपणा आहे. विलासरावांनी सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन तत्त्वाचे राजकारण केल्यामुळेच लातुरच्या राजकारणाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. लोकशाहीच्या माध्यमातून घटनेने सर्वांना समान मताचा अधिकार व लोकशाहीच्या मार्गाने परिवर्तन करण्याची ताकत सर्वसामान्य लोकांना मताद्वारे दिली आहे. या सत्ता परिवर्तनातून मात्र देशाचा विकास थांबता कामा नये अशी आशाही देशमुख यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास गोपाळराव पाटील, अनिरूध्द जाधव, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उप प्राचार्य ए.टी.राजू, उप प्राचार्य ई.यू.मासूमदार, उप प्राचार्य विलास कांबळे, पूजा तिपनगोने, दत्ता पवार आदी उपस्थित होते
Comments