लातूर: ज्याच्यावर मराठा समाजाचे जीवन होते ती शेती संपलेली आहे. समाजाने आता ज्ञानवंत बनून काळाच्या ओघात जे बदल होतात ते स्विकारले पाहिजेत असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.
पुरूषोत्तम खेडेकर यांचा मराठवाड्यात मराठा जनसंवाद दौरा सुरू आहे. लातुरच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
१९६२ पासून मराठा समाजाला आरक्षणातून वगळले आहे. पण, विदर्भात तसेच महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागात कुणबी मराठा म्हणून इतर मागासवर्गीयात त्यांचा समावेश आहे. हेच आरक्षण मराठवाड्यातील मराठा समाजालाही मिळाले पाहिजे असा आग्रह खेडेकर यांनी धरला. विश्वास नांगरे पाटील याच आरक्षणातून आयपीएस झाल्याचे खेडेकर यांनी आवर्जून सांगितले.
१९९४ पर्यंत एकूण आरक्षण ३४ टक्के होते. पुढे ते ५० टक्क्यांपर्यंत आले. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जाऊ नये असे म्हटले होते. हा निकाल १९९२ मधील आहे. अपवादात्मक परिस्थिती आरक्षण वाढवता येईल असेही या निकालपत्रात म्हटले होते. अशे खेडेकर म्हणाले.
शैक्षणिक व सामाजिक मागासलेल्यांना आरक्षण मिळू शकते. मराठा समाज यात बसतो. काही घराणे श्रीमंत आहेत म्हणून मराठा मागास नाही, असा निष्कर्ष काढता कामा नये. मंडल आयोगांनी त्यावेळी दुर्दैवाने मराठा समाजाची दखल घेतली नाही किंवा त्यासाठी आपण कमी पडलो.
नागपूर विधीमंडळाच्या अधिवेशनावर गोवारी समाजाने काढलेल्या मोर्चात चेंगराचेंगरी होऊन १०० पेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी राज्य सरकारने या समाजाला ०२ टक्के आरक्षण दिले. म्हणून आज ते ५२ टक्क्यांवर आल्याचे खेडेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास मराठा समाजबांधव तसेच मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व संघाच्या सर्व ३२ शाखांचे पदाधिकारी, प्रा. अर्जुन तनपुरे, लिंबराज सूर्यवंशी, वैभव तळेकर, रमेश गुजर, वनिता काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Comments