लातूर: मनपाच्या माध्यमातून शहर विकासाचे स्वप्न दाखविणा-या सत्ताधा-यांनी कोटयावधींचा निधी आल्याची खोटी जाहिरात केली. प्रत्यक्षात मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. मग शहराचा विकास सत्ताधारी कसा करणार? असा प्रश्न आमदार अमित देशमुख यांनी केला. मनपाच्या प्रभाग क्र.०५ अंतर्गत शहरातील सम्राट चौकात गुरु रविदास भवन विस्तारीतकरण व वडार भवनाच्या पायाभरणीचा शुभारंभ अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी अमित देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टिका केली. घोषणाबाजी करुन जनादेश मिळविलेल्या भारतीय जनता पक्षाने कोणताही अध्यादेश न जुमानता फक्त धनादेश घेण्याचेच काम केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा विकास टक्केवारीत अडकला असून आगामी निवडणुकीच्या काळात लातुरकरांनी याचा विचार करावा असे आवाहन देशमुख यांनी केले.
शहराच्या विविध विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांना सातत्याने पत्र पाठवून मुख्यमंत्री कार्यालयात पाठपुरावा आम्ही करतो. मात्र आमचीच पत्रे फिरवून ती कामे करुन घेतली जातात. आम्ही पत्रात सूचविलेली विकासकामे मंजूर झाल्यानंतर त्याचे श्रेय फेसबुक आणि व्हॉटस्अपवर टाकून त्याचे श्रेय घेण्यात सत्ताधारी आघाडीवर आहेत. श्रेय त्यांनी घेतले तरी कामे होत असल्याबद्दल आम्ही समाधानी आहोत असे देशमुख म्हणाले.
विकास कामांसाठी उपलब्ध होणारा निधी टक्केवारी शिवाय खर्च होत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. लोकांच्या कामासाठी निवडून दिलेले असतानाही त्यांच्या कामाकडे पाठ फिरवत कार्यालयात हजेरी न लावण्याचा उद्योग मनपातील सत्ताधा-यांकडून होत असून त्यांच्यातील गटबाजी आता उघड झाली असल्याचे देशमुख म्हणाले.
विकासाचे राजकारण आम्ही कधीच करणार नाही, असे सांगून सत्ताधा-यांनी आत्तापर्यंत किती निधी आणला याचे उत्तर द्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
अमृतच्या माध्यमातून जलवाहिनीच्या कामात दिरंगाई होत आहे. त्या गुत्तेदारास दंड झाला असला तरी तो वसूल का करण्यात आला नाही, या कामाला वाली कोण? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रभाग ०५ मधली ओपन जीम, सेव्हन स्टार संकल्पना आमच्या असून सत्ताधार्यांनी त्या पळविल्या असे विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले. अमित देशमुख यांनी लोकसभा विधानसभा निवडणूकांचा अश्वमेध यज्ञास सुरुवात करावी व अश्वमेधाचा घोडा विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा फडकाविल्याशिवाय थांबवू नये असे विक्रांत गोजमगुंडे म्हणाले.
उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी वडार समाजाच्या वतीने छिन्नी आणि हातोडा अमित देशमुख यांना भेट देण्यात आला.
कार्यक्रमास अशोक गोविंदपूरकर, अॅड. दीपक सुळ, ललित शहा, विनोद खटके, समद पटेल, शशिकांत अकनगिरे, पूजा पंचाक्षरी, फराजाना बागवान, राजकुमार जाधव, स्मिता खानापुरे आदींची उपस्थिती होती.
Comments