वैशालीनगर: विलास सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला पहिला हप्ता प्रति मेटन २२०० रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामात गाळप झालेल्या ऊस बिलाच्या पहिला हप्त्याची रक्कम संबंधित खात्यावर वर्ग केली आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या बॅकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करून सभासद आणि ऊसउत्पादकांच्या हिताचा विचार करून हंगामात गाळप होणाऱ्या ऊसास सर्वांधिक ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवली जाईल अशी ग्वाही माजी राज्यमंत्री, आमदार अमित देशमुख यांनी दिली आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारातील साखर कारखाने लातूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या अनुषंगाने विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख व सर्व संचालक मंडळाने चालू हंगामात गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन पहिला हप्ता २२०० रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
दर दहा दिवसाला ऊस बील
सभासद व ऊसउत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहेत. यामुळे कारखान्यास गळीतास आलेल्या ऊस बिलाचा पहिला हप्ता दर दहा दिवसाला बॅकेत वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्याप्रमाणे गाळप झालेल्या ऊसाची बिले दर दहा दिवसाला बॅकेत वर्ग केली जात आहेत, अशी माहिती कार्यकारी संचालक समीर बी. सलगर यांनी दिली आहे.
शेतकर्यांनी ऊसशेतीकडे वळावे...
शेतकऱ्यांना सलग पडलेल्या दुष्काळाला तोड दयावे लागले आहे. या वर्षीचा मान्सून सर्वसाधारण पडला असून खरीपातील मूग, ऊडीद व सोयाबीन पिकाचे उत्पन्न बऱ्यापैकी झाले आहे. पण सरकारी धोरणामूळे कोणत्याच शेतीमालाला भाव नाही. यामुळे शेतकरी अडचणी आला आहे. भविष्यात देखील शेतीमालाचे भाव वाढतील असे वाटत नाही. यावर्षी परतीचा मान्सून चांगला पडल्याने पाणी उपलब्ध आहे. ऊस हे हमखास उत्पन्न देणारे पीक आहे, यामुळे शेतकऱ्यांनी ऊसशेतीला प्राधान्य देण्याचे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले आहे.
Comments