लातूरः युवक कॉंग्रेस निवडणुकीत दलित उमेदवार पराभूत झाला. कॉंग्रेसला दलित केवळ मतदानासाठी हवे आहेत, पदे देण्यासाठी नको ही बाब स्पष्ट झाली. या प्रकरणातून कॉंग्रेसचा खरा चेहरा उघड झाला असे मत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी व्यक्त केले. युवक कॅंग्रेसचा अधिकृत उमेदवार पराभूत झाल्यानंतर लाहोटॊ यांनी निवेदनाद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत कुणाल श्रृंगारे यांना पक्षाने अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती. आमदार अमित देशमुख यांच्या संमतीनेच श्रृंगारे यांची उमेदवारी निश्चित झाली होती. परंतु प्रत्यक्षात कुणाल श्रृंगारे ६० पेक्षा अधिक मतांनी पराभूत झाले. कॉंग्रेसचा आजवरचा इतिहास पाहता दलित आणि मुस्लिम ही पक्षाची हक्काची वोटबँक आहे. परंतु दलित किंवा मुस्लिमांना पद देण्यात कॉंग्रेसने नेहमीच हात आखडता घेतला आहे. लोकशाही असल्याचे सांगत मतदान घेवून अधिकृत उमेदवाराला पराभूत करण्यात आले आहे असे लाहोटी म्हणाले. यापूर्वीही लातूर लोकसभा मतदारसंघ आरक्षीत झाल्यानंतर स्थानिक नेतृत्व मोठे होवू नये यासाठी इचलकरंजीहून जयवंत आवळे यांना आयात करून निवडून आणले होते. आताही त्याच पध्दतीने अधिकृत उमेदवाराला पराभूत केले गेले असे लाहोटींनी निवेदनात म्हटले आहे.
पक्ष नेतृत्वाने ठरवलेल्या उमेदवारास दुसर्या गटाने पराभूत केले. लातुरात कॉंग्रेस नेतृत्वाच्या संमतीशिवाय बंडखोरी किंवा उमेदवारांची पाडा-पाडी होवू शकत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
दलित समाजाने केवळ मते द्यावीत, पक्षाने मात्र त्यांना कसलीही पदे देवू नयेत असाच हा प्रकार असल्याचे लाहोटी म्हणाले. कॉंग्रेस पक्षात घराणेशाही आणि मालकशाही चालत आलेली आहे. देशमुख घराण्याभोवती पक्षाचे राजकारण फिरत आले आहे. देशमुख सांगतील तीच पक्षासाठी पूर्वदिशा राहिलेली आहे. त्यामुळे श्रृंगारेंना जाहीरपणे उमेदवारी दिल्यानंतर ते पराभूत झाले. हा निर्णय नेत्यांनीच घेतलेला असावा असा संशयही लाहोटी यांनी व्यक्त केला.
Comments