लातूर:कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून विविध कामांसाठी ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे . यासंदर्भात राज्य शासन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्यामध्ये लोदगा येथे आयोजित कार्यक्रमात करार केला जाणार आहे. यावेळी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवून कार्यशाळा व चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली .
पत्रकारांना माहिती देताना पाशा पटेल म्हणाले की ,गेल्या काही दिवसात शेतीवर अनेक संकटे येत आहेत. यामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे .ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची किती क्षेत्रावर पेरणी केली आहे याची अचूक माहिती मिळू शकते. पिकावर रोगराई पसरली असेल तर नेमकी कोणत्या परिसरात ती पसरली आहे याचीही माहिती मिळू शकते. नैसर्गिक आपत्ती आली तर त्याची व्याप्ती किती आहे याचा अंदाज घेता येऊ शकतो.
शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते ही बाब लक्षात घेता आपण बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेशी संपर्क साधला होता. या संस्थेने शेतीसाठी उपयोगात येणारे ड्रोन तयार केले आहेत. त्याची पाहणी केल्यानंतर हे तंत्रज्ञान मुख्यमंत्र्यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्या शास्त्रज्ञ सोबत चर्चा केल्यानंतर हे तंत्रज्ञान वापरण्यास अनुमती दिली. यासंदर्भात शासन आणि इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स यांच्यातील करार लोदगा येथे दिनांक २४ व २५ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात केला जाणार आहे.
Comments