HOME   लातूर न्यूज

खरिपाचे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करावेत

कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे आग्रहाची मागणी


खरिपाचे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करावेत

लातूर: शेतकऱ्यांनी यंदा खरिप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद व मूग पिकांचे पावसाच्या अभावी नुकसान झाले आहे. पेरणी नंतर दिर्घकाळ पाऊस न पडल्यामूळे पिकांचा पालापाचोळा झाला आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना लातूर तालूका काँग्रेस कमिटीच्या वतीने जि.प.सदस्य धीरज देशमुख, तालुका अध्यक्ष दगडूसाहेब पडीले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले आहे.
निवासी उपजिल्हाधिकरी यांच्याकडे निवेदन देण्या आधी धीरज देशमुख यांनी लातुर तालुक्यातील एकुरगा, माटेफळ, खंडाळा येथील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यासोबत सद्याच्या परिस्थिती बददल चर्चा केली. खरिप हंगामाच्या सुरूवातीस पाऊस झाल्यानंतर पावसाने खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. जुलै व ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसात खंड पडल्यामुळे खरिप हंगामातील पिकांचे पोषण झाले नाही. शेंगा लागण्याच्या स्थितीत पावसाने ओढ दिल्याने आलेले मूग, उडीद, सोयाबीन शेंगांचे पोषण झाले नाही. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळेही पाने पिवळी पडत आहेत, यामुळे सोयाबीनचा पाचोळा झाला आहे. खरीपातील सर्व पिके आता शेतकऱ्याच्या हातून गेली आहेत. शेतकरी सद्या आर्थीक अडचणीत सापडला आहे. शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पिकांचे पंचनामे करून मदत देऊन दिलासा द्यावा, यासाठी शुक्रवार रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना या अडचणीतून सोडवण्यासाठी शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत असे लातूर तालूका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


Comments

Top