लातूर: येथे ०७ ऑक्टोंबर रोजी होणार्या अटल महाआरोग्य शिबीरात कोणत्याही पक्षाचे लेबल न लावता सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात महा आरोग्य शिबीरासंदर्भात सर्वपक्षीय बैठक झाली त्यावेळी निलंगेकर बोलत होते. लातूर,औसा,रेणापूर,निलंगा व चाकूर या पाच तालुक्यासाठी हे शिबीर घेतले जात आहे.
जिल्हयातील प्रत्येक गोर-गरीब व गरजू रूग्णांना या शिबीरातील आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्याची जबादारी सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठी सर्वांनी या महाआरोग्य शिबीरात आपले योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शिबीरात जिल्हयातील सर्वसामान्य गरजू रूग्णांना सर्व रोग निदान व उपचार एकाच ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यर्त्यांनी आपल्या परिसरातील गरजू रूग्णांना चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही निलंगेकर यांनी केले.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ् मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक रूग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. गोर-गरीब रूग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे महागडे उपचार घेणे शक्य नसते. अशा सर्व रूग्णांना या शिबीरात विनामूल्य सर्व प्रकारचे उपचार व जगप्रसिद्ध नामवंत व तज्ञ डॉक्टर्सकडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे परिसरातील एकही गरजू रूग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचाना त्यांनी दिल्या.
यावेळी माजी खा.गोपाळराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद उप आध्यक्ष रामचंद्र तिरूके, उपमहापौर देविदास काळे, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ् निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी,आरोग्य उपसंचालक हेमंत बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक संजय ढगे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ परगे, डॉ श्रीधर पाठक, इतर राजकीय पक्षांचे प्रमुख पदधिकारी उपस्थित होते.
Comments