लातूर : मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखाने उत्कृष्ट चालतात. कारखान्यांच्या माध्यमातून वर्षभरात ०५ हजार कोटी रुपये बाजारपेठेत आले आहेत. त्यातून लातुरची अर्थव्यवस्था चालत असल्याचे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी केले.
विलास साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत अमित देशमुख बोलत होते.
शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी भाव, कर्मचारी, कामगारांना नियमित चांगले पगार , बोनस दिले जातात. वाहतूकदार, कंत्राटदारांनाही काम मिळते. अप्रत्यक्ष उद्योग व्यवसायातून अधिकाधिक रक्कम लोकांना मिळाली असल्याचे देशमुख म्हणाले.
मांजरा परिवाराने चांगला ऊसदर देऊन शेतकऱ्यांची आर्थिक पत उंचावली आहे. शिक्षण क्षेत्रात काम सुरु आहे. परिसरातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे त्यांना माफक दरात अद्ययावत आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून कारखान्याच्या वतीने मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येईल अशी घोषणा आमदार देशमुख यांनी केली.
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या राज्य आणि केंद्रातल्या भाजपा सरकारने चार वर्षात जनतेचे खिसे कापून त्यांना लुटण्याचेच काम केले आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कर्मचारी, कामगार वर्ग त्रस्त झाले आहेत. परिणामी २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी केले आहे.
जगात पेट्रोल, डिझेलचे दर कमी असताना भारतातील सरकार मात्र चढ्या भावाने विकत आहे. सरकारने इंधन दरवाढीनंतर तब्बल १२ हजार कोटी सामान्य जनतेच्या खिशातून काढून घेतले हा एकप्रकारे खिसे कापण्याचाच प्रकार असल्याचे देशमुख म्हणाले.
इंधनाचे वाढलेले दर कमी करण्याची ताकद साखर कारखान्यात आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवून ते शक्य होणार आहे. इथेनॉलचे नवे दर, साखर आणि वीज निर्मितीमुळेही सरकारला मोठे उत्पन्न मिळत असताना सरकारचा या उद्योगांकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. त्यामुळे सरकारचा दृष्टीकोन बदलण्याची अपेक्षा न ठेवता सरकार बदलण्यासाठीच शेतकऱ्यांनी आपली शक्ती खर्च करणे गरजेचे असल्याचे देशमुख म्हणाले.
जनतेचे सहकार्य आणि आशिर्वादावर्च आमचे सर्वाजनिक जीवनातील अस्तित्व अवलंबून आहे. याचा विसर पडू नये अशी प्रार्थना दररोज ईश्वरचरणी करीत असतो. हेच आमचे कौटुंबिक संस्कार आणि शिकवण असल्याचे देशमुख यांनी म्हटले.
कारखाना परिसरात विलासराव देशमुख यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्यची माहिती त्यांनी दिली. याशिवाय प्रशासकीय इमारत, मंगल कार्यालय, ट्रेनिंग सेंटर आदींची उभारणीही होणार असल्याचे देशमुख म्हणाले.
यावेळी आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अॅङ श्रीपती काकडे, बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा, गोकुळ माऊली शुगरचे चेअरमन व्ही.पी.पाटील, विक्रम हिप्परकर, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, रेणा साखचे उपाध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी सूळ, मांजरा साखरचे संचालक जगदीश बावणे, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, माजी कार्यकारी संचालक एस.डी.बोखारे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडुसाहेब पडीले, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष लालासाहेब चव्हाण, कारखान्याचे व्हा.चेअरमन गोविंद बोराडे उपस्थित होते.
Comments