लातूर: व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले एफडीआयचे भूत घालविण्यासाठी विविध संघटनांनी तसेच आपल्या न्याय मागण्यांसाठी केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्टने शुक्रवारी राष्ट्रव्यापी बंदची हाक दिली असून या बंदला लातूर व्यापारी महासंघाने पाठिंबा देऊन शुक्रवार२८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गंजगोलाई येथून मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी दिली.
लातूर व्यापारी महासंघाच्या बैठकीत या राष्ट्रव्यापी बंदला पाठिंबा देण्याचा व एफडीआयच्या विरोधात मूक मोर्चाने जाऊन जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सोलंकी यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, एफडीआयमुळे देशातील पारंपारिक व्यापार संपुष्टात येईल. किरकोळ व्यापारांवर कोट्यावधींचे संसार अवलंबून आहेत. हे सर्व घटक आणि व्यापारीही रस्त्यावर येतील. व्यापारी आणि ग्राहक यांच्यात एक अतूट असे नाते आहे. व्यापाऱ्यांची बांधिलकी ग्राहकांशी आहे. या विश्वासाने चाललेला व्यापार कायमचा बंद होईल, असे त्यांनी सांगितले.
वालमार्टसारख्या कंपन्या सुरूवातीला ग्राहकांना भुरळ घालतात. फोनवरून घरपोच डिलेव्हरी दिली जाईल. मालाची गुणवत्ता काय, हा प्रश्न त्यातून निर्माण होतो. तसेच सामान्य ग्राहक मॉलमध्ये जाऊन खरेदी करू शकत नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेता केंद्र सरकारने बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात येण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली.
शुक्रवारच्या या मूक मोर्चात व्यापारी बांधवांनी तसेच व्यापारातील विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी, भारत माळवदकर, मनीष बंडेवार, विश्वनाथ किनीकर, रामदास भोसले, बसवराज वळसंगे, निजाम हुच्चे, निसार इंदानी, कमल जोधवानी, विनोद गिल्डा, दत्तात्रय पत्रावळे, विशाल ईटकर आदींनी केले आहे.
Comments