HOME   लातूर न्यूज

लातूर पॅटर्नचा गैरफायदा घेणारेही येथे कमी नाहीत

शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके


लातूर पॅटर्नचा गैरफायदा घेणारेही येथे कमी नाहीत

लातूर: शिक्षणाचा लातूर पॅटर्न सर्वदूर पसरला आहे. या लातूर पॅटर्नचा गैरफायदा घेणारेही येथे काही कमी नाहीत. यावर आम्ही अंकुश ठेवून विद्यार्थी व पालकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे मत यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांची औरंगाबादेत बदली झाल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला. नूतन उपसंचालक संजय यादगिरे यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम शिक्षण मंडळाच्या प्रांगणात बुधवारी सांयकाळी संपन्न झाला, यावेळी सत्काराला उत्तर देताना खांडके बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर हे होते. मंचावर लातूर मंडळाचे सचिव शशिकांत हिंगोणीकर, श्रीमती खांडके यांची उपस्थिती होती. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून काम करण्याची गरज आहे, असे नमूद करून खांडके म्हणाले की, आपणच आपल्या पदाची सकारात्मक व पारदर्शक काम करून उंची वाढविली पाहीजे. मी लातूरात असताना कोणालाच काही दिलेले नाही. नियमाच्या व कायद्याच्या चौकटीत राहून काम केले. शिक्षण उपसंचालकाने घेतलेल्या निर्णयाला केवळ उच्च न्यायालयातच आव्हान देता येते. त्यामुळे हे पद न्यायाचे असल्याने जबाबदारीने काम करावी लागते, असे त्यानी नमूद केले.
नूतन शिक्षण उपसंचालक संजय यादगिरे यांनी शिक्षणाचा लातूर पॅटर्न दोन-चार शाळा, महाविद्यालयामध्ये असून चालत नाही तर तो सर्वसमावेशक असावा असे नमुद करून ते म्हणाले की, आमची नेमणूक विद्यार्थ्यांसाठी असते. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू असेल. सकारात्मक भूमिकेतून लातूरने मला स्विकारले आहे. त्यामुळे माझे कामही सकारात्कच असेल. आमच्याकडून खूप अपेक्षा असतात. त्या पुर्णत्वाला नेण्यासाठी दोन्ही बाजूकडून सहकार्य अपेक्षित असते. खांडके यांचाच वारसा मी पूढे चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Comments

Top