लातूरः एकसंघ भारताच्या मुद्यावर महात्मा गांधी ठाम होते परंतु धूर्त ब्रिटीशांना भारतावरील सत्ता सोडण्यापूर्वी या देशाची फाळणी करायची होती. त्यामुळेच या मागणीला खतपाणी घालून स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा प्रक्रिया ब्रिटीशांनी सुरू केली होती. त्यामुळे या देशाची फाळणी गांधीनी नव्हे तर ब्रिटीशांनीच केली होती असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे अभ्यासक तथा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाणच्या प्रतिष्ठानच्या लातूर विभागीय केंद्राच्या वतीने महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित ‘२१ व्या शतकात महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे होते. परिसंवादातील दुसरे वक्ते महाराष्ट्र राज्य तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार हे होते. याप्रसंगी मंचावर अॅड. मनोहरराव गोमारे, प्रा. शाम आगळे हे उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ. चौसाळकर म्हणाले की, महात्मा गांधी हे असाधारण कर्तृत्व असणारे व्यक्ती होते. त्यामुळे अन्यायी ब्रिटीशांविरूध्द लढण्यासाठी अहिंसा व सत्याग्रहाची हत्यारे त्यांनी वापरली. त्यामुळे मोठा नरसंहार टळला. गांधीजींनी प्रारंभी अशा वर्णव्यवस्थेला समर्थन दिले की, ज्या वर्णव्यवस्थेत सर्व वर्ण समान, वर्ण बदलण्याचा सर्वांना अधिकार, सर्व वर्णांना समानाधिकार असेल. आंतरजातीय विवाहाला त्यांनी प्रोत्साहन देवून एका अर्थाने वर्ण व्यवस्था मोडीत काढण्याचाच प्रयत्न त्यांनी केला. लोकमान्यांच्या गीता रहस्यांमधील मांडणी गांधीजींना बर्याचअंशी मान्य नव्हती. माणसाने कुठल्या ग्रंथाला किंवा सिध्द पुरूषांना प्रामाण्य मानण्यापेक्षा सद्सद् विवेक बुध्दीला प्रामाण्य मानले पाहिजे असाही बापूंचा आग्रह होता.
या परिसंवादाचे सुत्रसंचालन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विवेक सौताडेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे सदस्य प्रा. शाम आगळे यांनी मानले. याप्रसंगी भीमराव दुनगावे व सुरेंद्र स्वामी, विनोद चव्हाण आदिंनी परिश्रम घेतले.
Comments