लातूर: लातूरसाठी उजनी धरणातून पाणी देण्यास विरोध करणारे लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रिमंडळातून काढण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना यावी यासाठी शिवसेनेच्या वतीने लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर व निलंग्याचे ग्रामदैवत निळकंठेश्वरास उजनी धरणातील पाण्याचा मंगल कलश आणून अभिषेक केला जाणार आहे. मंगळवारी हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे लातूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांनी दिली.
०८ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर आले असताना स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी लातूरसाठी उजनी धरणातून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी केली होती. परंतु पालकमंत्री संभाजी पाटील यांनी ही योजना आवश्यक नसल्याचे सांगत विरोध केला होता. पालकमंत्र्यांच्या दळभद्री भूमिकेमुळे लातूरकरांना यापुढेही दुष्काळाचे चटके सोसावे लागणार आहेत. लातुरच्या हिताविरोधी भूमिका घेणाऱ्या संभाजी पाटील यांना मंत्रिमंडळातून हाकलावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. संभाजी पाटील यांना मंत्रिमंडळातून काढण्याची सदबुद्धी मुख्यमंत्र्यांना यावी यासाठी उजनीच्या पाण्याचा मंगल कलश आणून ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि निलंग्याचे ग्रामदैवत नीळकंठेश्वरास अभिषेक करण्याची घोषणा सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी जलाभिषेक केला जाणार आहे.
सकाळी ९ वाजता अभय साळुंके यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उजनी धरणातील पाण्याचा मंगल कलश घेऊन लातुर कडे रवाना होणार आहेत .दुपारी १ वाजता लातूर येथील शिवाजी चौकात या मंगल कलशाचे आगमन होणार आहे. शिवाजी महाराजांना अभिवादन करून निवडक कार्यकर्त्यांसह मोटर सायकल रॅलीद्वारे कार्यकर्ते सिद्धेश्वर मंदिराकडे जाणार आहेत. दुपारी ०२ वाजता या पाण्याने सिद्धेश्वराला अभिषेक करून पूजा केली जाणार आहे. त्यानंतर ३ वाजता शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार असून या आंदोलनासंदर्भात पत्रकारांसमोर भूमिका मांडण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता मंगल कलश घेऊन निलंग्याकडे पदाधिकारी व कार्यकर्ते रवाना होणार आहेत. सायंकाळी ०५ वाजता निलंगा येथील शिवाजी चौकात शिवरायांना अभिवादन करून ५.१५ वाजता मोटरसायकल रॅलीने निळकंठेश्वर मंदिराकडे रवाना होणार आहेत.
Comments