लातूर: सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकर्यांची प्रगती होणे अपेक्षित आहे. याकरीताच भाजपाच्यावतीने सहकार क्षेत्राचा कारभार पारदर्शक करून त्याचे बळकटीकरण करण्यासाठी विविध प्रयत्न होत आहेत, मात्र लातूर जिल्ह्यातील कॉंग्रेस व सेनेच्या नेत्यांकडून सहकार मोडीत काढण्याचा घाट मारोती महाराज कारखान्याच्या माध्यमातून होऊ घातलेला असून ज्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी खाजगीकरणाची वाट धरलेली आहे, त्यांच्यासोबत सेनेने आघाडी करून शेतकर्यांचा विश्वासघात केला असल्याची टीका राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
मारोती महाराज कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त औसा तालुक्यातील नागरसोगा व मातोळा येथे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, माजी आ. गोविंद केंद्रे, किरण उटगे, संताजी चालुक्य, महेश पाटील, मुक्तेश्वर वागदरे, अरविंद कुलकर्णी, सुनिल उटगे, सुभाष जाधव आदींची उपस्थिती होती.
मारोती महाराज कारखाना चालू व्हावा याकरीता शिवसेनेच्या दिनकर माने यांनी जिल्हा बँकेकडे कर्जाची मागणी केली असल्याची आठवण करून देत ना. खोत यांनी ज्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आहे, त्यांच्यासोबतच आघाडी करून ही निवडणूक लढविण्याचा उद्योग का करण्यात येत आहे असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला. मांजरा परिवाराने सर्वाधिक भाव दिला असे सांगत पाठ थोपटून घेण्याचे काम केले असले तरी रिकव्हरीच्या माध्यमातून त्यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला असल्याचा आरोपही ना. खोत यांनी यावेळी केला. कारखाना काढणारे हेच, बंद पाडणारे सुध्दा हेच तसेच कर्ज देणारेही हेच आणि कर्ज घेणारेही हेच असा उद्योग सहकार क्षेत्राच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात होत आहे. याच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मारोती महाराजच्या कारखान्याला कर्ज नाकारून आता हा कारखाना पुन्हा चालविण्याचा खोटारडेपणा कॉंग्रेसकडून होत असल्याचे त्यांनी वेळी निदर्शनास आणून दिले. मांजरा परिवारातील काही कारखाने खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरू असून नवीन कारखाने सुध्दा खाजगीकरणाच्या माध्यमातूनच उभा करीत असल्याचे सांगून हा कारखाना ताब्यात घेवून सहकार मोडीत काढण्याचा घाट कॉंग्रेस व सेना आघाडीच्या माध्यमातून होत असल्याची कडवट टीका ना. खोत यांनी यावेळी केली.
भाजपाने सहकार क्षेत्राला अधिक बळकट करून त्याचा कारभार पारदर्शक करण्यासाठी ठोस पावले उचलली असल्याचे सांगून मारोती महाराज कारखाना अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या ताब्यात दिल्यास निश्चितच कारखाना शेतकर्यांचे हित जोपासून त्यांची आर्थिक प्रगती करेल असा विश्वास व्यक्त केला. प्रगती पॅनलचे चिन्ह असलेल्या किटलीत पाण्यासोबत दुध व साखर असून त्यामुळे तालुक्यातील पाणी पुरवठ्याच्या योजनासह दुग्ध व्यवसाय व साखर उद्योगाला चालना मिळणार आहे. त्यामुळेच हे पॅनल निवडून आल्यास निश्चितच चौफेर विकास साधला जाईल अशी ग्वाही ना. खोत यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी यापूर्वीच हा कारखाना मांजरा परिवाराच्या घशात गिळंकृत करण्याचा प्रयत्न झाला होता असे सांगून तो आम्ही हाणून पाडल्याचे सांगितले. आता या निवडणुकीच्या माध्यमातून कॉंग्रेस व सेनेमध्ये अभद्र हातमिळवणी होवून शेतकर्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचे काम होत असल्याचे सांगितले. मांजरा परिवाराने शेतकर्यांची पत व प्रतिष्ठा वाढवली असे सांगण्यात येत असेल तर विकास-२ च्या (प्रियदर्शनी) कारखान्याला मांजराच्या बरोबरीने का भाव दिला नाही असा प्रश्नही उपस्थित केला. ज्या मांजरा परिवाराच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस-सेना निवडणूक लढवित आहे त्या पॅनलच्या प्रचार साहित्यावर मारोती महाराजांसह तालुक्याच्या आमदारांचा व कारखान्याच्या अध्यक्षांचे छायाचित्र छापण्यात आले नसल्याचे निदर्शनास आणून देत यातून कॉंग्रेस नेतृत्व केवळ स्वतःचे हित जोपासत असल्याचे स्पष्ट होते, असे सांगितले. त्यामुळेच या अभद्र हातमिळवणीला दुर्लक्षित करून कारखान्याच्या सभासदांनी स्वतःच्या हितासाठी भाजपाच्या प्रगती पॅनलला विजयी करावे असे आवाहन केले.
Comments