निलंगा: पालकमंञी संभाजीराव पाटलांनी टक्केवारीकडे लक्ष देण्यापेक्षा आणेवारीकडे लक्ष द्यावे ,त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल. माञ पालकमंञी शेतकऱ्यांकडे न पाहता टक्केवारीकडे पाहून भावाचेच भले करत असल्याचा घणाघात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अभय साळूंके यांनी निटूर येथील रास्ता रोको वेळी केला. खरीप हंगाम हातचा गेला आहे. रबीची पेरणी नाही. त्यात पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला असून आता शेतकऱ्यांना जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे सरकारने आता तात्काळ दुष्काळ जाहीर करून दुष्काळी मदत म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रूपयाची मदत द्यावी अशी मागणीही साळूंके यांनी केली.
निटूर येथे शिवसेनेच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवाजी सोमवंशी, नागाप्पा बुडगे,प्रशांत पाटील, महेबूब शेख, प्रसाद बुरकूले, विजय जाधव, लायकपाशा शेख, अमर निटूरे, सिद्धेश्वर बिराजदार, गोविंद बुडगे आदी उपस्थित होते. सकाळी अकराच्या दरम्यान सुरू झालेला रास्ता रोको तासभर चालला. या आंदोलनामुळे लातूर-निटूर रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती. आपल्या भाषणामध्ये साळूंके यांनी अनेक विषयाना हात घालत तालूक्याची आणेवारी प्रशासनाने ६१ पैसे दाखवल्याचे सांगून आणेवारी जर ५० पैशापेक्षा कमी दाखवली तरच दुष्काळ जाहीर होणार असल्याचे सांगितले.
Comments