HOME   लातूर न्यूज

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात

मारुती महाराज साखर कारखाना : आ. अमित देशमुख


शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात

लातूर: लातूर, औसा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. ते अडचणीत येत आहेत हे लक्षात घेवून त्यांना दिलासा देण्यासाठी, मदतीचा हात घेवून आम्ही श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना निवडणूकीत विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून उतरलो आहोत. असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
श्री मारुती महाराज साखर कारखान्याच्या निवडणूकीतील विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ विजयादशमीचे औचित्य साधून नागरसोगा येथे आयोजित पहिल्या प्रचार सभेत पॅनल प्रमुख म्हणून आमदार अमित देशमुख यांनी आपली भूमिका विस्तृतपणे मांडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी वामनराव शिंदे होते. यावेळी व्यासपिठावर पॅनलचे समन्वयक एस. आर. देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सत्तारभाई शेख, राजेंद्र मोरे, शेतकरी संघटनेचे अरुण कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनराव भोसले, सुभाष पवार तसेच कल्याण पाटील, रामदास चव्हाण, सौ.स्वयंप्रभा पाटील, मधुकर सुर्यवंशी, यशवंत शिंदे, अशोक शिंदे, सतिश फावडे, खंडू जाधव, विलास पाटील, सचिन दाताळ, अजित मुसांडे, यशवंत सुर्यवंशी, दिलीप मुसांडे, धनराज मुसांडे, पांडुरंग चेवले, कालिदास जवळे, व्यंकट काकडे, उमेदवार हरिश्चंद्र शेषेराव यादव, शामराव निवृत्ती साळुंके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते.
पॅनल उभा करण्यासाठी शेतकऱ्यांचाच आग्रह
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या सभेत भूमिका मांडताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, मांजरा परिवारातील सर्वच कारखाने चांगले चालत असताना औसा तालुक्यातील किल्लारी व मारुती महाराज हे कारखाने मात्र अडचणीत आहेत. कारखाने बंद असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. कारखान्याला ऊस जात नाही, गेला तर त्यांचे पैसे मिळत नाहीत. या परिस्थितीत निवडणूक लागलेल्या मारुती महाराज कारखाण्यासाठी मांजरा परिवाराने पॅनल उभे करावे, असा आग्रह येथील शेतकऱ्यांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब व माझ्याकडे धरला होता. केवळ अडचणीत असलेल्या या शेतकऱ्यांचे भले करावे, त्यांना अडचणीतून बाहेर काढावे हा उद्देश ठेवून या निवडणूकीत पॅनल उभे केले आहे.


Comments

Top