HOME   लातूर न्यूज

महापौर आणि दहा रुपयात गाजर हलवा...

‘काम की बात’


महापौर आणि दहा रुपयात गाजर हलवा...


आपले महापौर आहेत सुरेश पवार. त्यांना परवा एका सर्वसाधारण सभेनंतर कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी गाजरं भेट दिली. महापौरांनी ती हातात घेतली अन ठेऊन दिली. हा सारा प्रकार घडला महापौरांवरील संशयावरुन. महापौरांनी गुंठेवारी प्रकरणावरील ही सभा आटोपती घेतली, कुठंतरी पाणी मुरतंय असं या सदस्यांना वाटत होतं....असो.
महानगरपालिकेत महापौरांना काम करु दिलं जात नाही. विरोधकांपेक्षा पक्षातलेच विरोधक त्यांच्यावर कुरघोडी करतात असं बोललं जातं. पक्षातल्या विरोधकांपेक्षा बाकीचे विरोधक बरे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर अनेकदा येते. पण ते म्हणत नाहीत. कारण त्यांचं आडनाव पवार आहे. पवार आडनावातली जादू बहुदा अजून सुरेशरावांना कळालेली दिसत नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणात एक पवार नावाचे जादूगार नेते आहेत (शरद पवार नव्हे). त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से राजकारणीच लोक सांगतात. एखादी गोष्ट करणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं की ते हमखास करतात. करायची म्हटलं की हमखास करणार नाहीत असा त्यांचा बोलबाला असतो. त्यांनी दिलेलं औषध तर भलतं रामबाण असतं असंही बोललं जातं. त्यांच्याबद्दलचा एक किस्सा भलता फेमस आहे. एका जत्रेत म्हणे त्यांनी एक लांबलचक मोठा स्टॉल लावला होता. या स्टॉलमध्ये एका बाजुने प्रवेश तर दुसर्‍या टोकाला बाहेर जाण्याचं दार होतं. प्रवेशद्वाराजवळ मोठी गर्दी व्हायची आणि बाहेर पडताना लोकं बोटं मोडत बाहेर पडायची. गर्दीचं कारण या स्टॉलवर लावलेल्या पाटीत होतं. पाटी होती ‘दहा रुपयात गाजर हलवा’. लोक यायचे तिकिट काढायचे आत जायचे. आत-आत गेल्यावर काय दिसायचं? वर एका दोरीला गाजर लटकावलेलं अन गाजराला एक दोरी बांधलेली. तिचं एक टोक आतला माणूस गिर्‍हाईकाच्या हातात द्यायचा अन म्हणवायचा, हलवा गाजर! काय करणार? अनेक गिर्‍हाईकांनी गाजरही सही म्हणत दोरी जोरजोरात हलवली पण पण गाजर काही खाली पडतच नव्हतं. कंटाळून गिर्‍हाईक शिव्या देत निघून जायचं. अशी गाजरं अनेक पक्षातल्या लोकांनी या स्टॉलमध्ये येऊन हलवली पण ते काही पडलंच नाही!
महापौर कामात कमी आणि उदघाटन अन समारंभातच अधिक दिसतात अशी तक्रार अनेकजण करतात, महापौरांना भेटलो पण काम काही झालेच नाही असंही ऐकायला मिळतं. हे सगळं थांबवायचं असेल तर सुरेशरावांना आपलं आडनाव पवार आहे याची आठवण सतत ठेवावी लागेल. नाही तर ‘महापौरपदाचा लाडू ज्याने खाल्ला तो पस्तावला आणि नाही ज्याने नाही खाल्ला तोही पस्तावला’ असं म्हणण्याची वेळ येणार आहे!


Comments

Top