औसा :अमितभैय्या, तुमच्याकडे जिल्हा बॅंक असतानाही तुमच्या विकास आणि प्रियदर्शिनी कारखान्याला आम्ही पैसे दिले. आता मारुती महाराज कारखाना सुरू करण्यासाठीही पैसे देणार आहे. आमच्या मुंबई जिल्हा बॅंकेला शेतकऱ्यांची काळजी आहे तुम्ही पैशांची काळजी करू नका. मारुती महाराज कारखान्यासाठी लागतील तेवढे पैसे तात्काळ देतो, असे आश्वासन मुंबई जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी दिले.
मारुती महाराज सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजपा प्रणित संत शिरोमणि मारुती महाराज शेतकरी प्रगती पॅनल च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आ. दरेकर औसा तालुक्यात आले होते. तालुक्यातील खुंटेगाव आणि लामजना येथे सभा घेऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर औसा येथे पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ सुधाकर भालेराव, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, पॅनल प्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार, रमेश अप्पा कराड आदीची उपस्थिती होती. पत्रकारांशी बोलताना आ. दरेकर म्हणाले की आम्हालाही कारखानदारीतले समजते. ते समजले नसते तर आम्ही तुमच्या कारखान्याला कर्ज दिलेच नसते. शेतकऱ्याना मदत करण्यासाठी आम्ही कारखान्याला मदत करीत आहोत. आतापर्यंत राज्यातील दहा कारखान्याना मदत केली आहे. शेतकऱ्याना मदत करण्यासाठी धोरणात बदल करावा लागला तरी तो करण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले. शेतकर्यांच्या हितासाठी भाजपा पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरला असल्याचे ते म्हणाले. प्रस्थापितांच्या विरोधात जनता एकवटली आहे. त्यामुळे विरोधकाना त्यांची जागा दाखवुन देण्याचे काम जनताच करेल असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
अभिमन्यु पवार म्हणाले की, मुख्यमंत्री कार्यालय काय असते ? त्याचा शेतकऱ्याना काय फायदा होतो ते आता जनतेला समजत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.या निवडणुकीच्या माध्यमातुन आम्हाला शेतकऱ्यांचे हित साधायचे असल्याचे ते म्हणाले.
Comments