HOME   लातूर न्यूज

कव्हेकरांच्या जनसंवाद यात्रेला सारसातून सुरुवात

हमीभाव, पीकविमा नुकसान भरपाईसाठी जनआंदोलनाची गरज- कव्हेकर


कव्हेकरांच्या जनसंवाद यात्रेला सारसातून सुरुवात

लातूर: मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात अनपेक्षित परिस्थिती निर्माण झालेली असून शासन दरबारी त्यावर कोणतेही त्वरीत पावले उचलली जात नाहीत. तमाम शेतकरी वर्ग अनंत आर्थिक अडचणीत व विवंचनेत सापडलेला आहे, त्यांना आधार देण्यासाठी तसेच हमीभावाची अमलबजावनी व्हावी, पीक विमा सरसकट लागू करावा तसेच नुकसानग्रस्त शेतीपीक व सोयाबीनला एकरी ५० हजाराचे अनुदान देण्यात यावे. आदी मागण्या मांडून त्या बुलंद करण्यासाठी जननायक संघटनेच्या वतीने जनसंदवाद यात्रा लातूर तालुक्यातील ५४ गावात राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन लोकनेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले या यात्रेच्या लातूर तालुक्यातील सारसा येथील शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी अध्यक्षपदी गावचे माजी सरपंच परमेश्‍वर भिसे, प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी रामेश्‍वर रोडगे, माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जलसंधारण विभागाचे उपअभियंता डी.एस.कांबळे, शाखा अभियंता शिनगारे, उपसरपंच बब्रुवान पवार माधव कदम, तंटामुक्‍ती अध्यक्ष रावसाहेब भिसे, जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके,बाबासाहेब देशमुख, कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, कार्याध्यक्ष नरसिंग इंगळे, चिटणीस राजाभाऊ मुळे, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जिल्हा युवा अध्यक्ष प्रा.मारोती सुर्यवंशी, श्रीकांत झाडके आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना लोकनेते माजी आ.कव्हेकर म्हणाले की, आपण गत मागील काळात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात रेणापूर तालुक्यातील ७५ गावात व औसा तालुक्यातील ३० गावात थेट ग्रामीण जनतेशी, तमाम शेतकर्‍यांशी संवाद साधला असून सर्वांची प्रश्‍न नागरी समस्या जाणून घेऊन, त्या दृष्टीने शासन स्तरावर आवाज उठवून पाठपुरावा करून पद व सत्‍ता असो, अथवा नसो अनेक प्रश्‍न सोडविले. बहुतेक गावातील विजेचा प्रश्‍न, पाणी टंचाई सोडविण्यासाठी व गारपीट अनुदान देण्यासंदर्भात गतीने प्रयत्न केले. आज १९७२ पेक्षा भिषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असून त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तमाम शेतकर्‍यांचे दुखः जाणून घेवून त्यांना आधार देत आत्मविश्‍वास वाढीसाठी आपण संवाद साधत आहोत. हमीभावाची त्वरीत अमलबजावणी व्हावी. पिकांचे अनुदान देण्यात यावे, मध्यप्रदेश व हरियाणा राज्य सरकार प्रमाणे भावांतर योजना लागू करून फरकाची रक्‍कम देण्यात यावी, अटी शिथील करून पीक विमा सरसकट लागू करावा, नुकसानग्रस्त सोयाबीनला एकरी ५० हजाराचे अनुदान देण्यात यावे, या मागण्या प्रामुख्याने शासन दरबारी मांडण्यासाठी तमाम शेतकर्‍यात आत्मविश्‍वास पेरून लढण्याचे बळ देण्यासाठीच आपण गावा-गावात संपर्क अभियान राबवित आहोत. शेतकरी बांधवानी कोणत्याही अडचणीचा धाडसाने सामना करावा, प्रसंगी आपणांस हाक मारावी, आम्ही सदैव जनसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी तत्पर आहोत, असा आशावाद जनसंवाद यात्रेच्या माध्यमानतून आयोजित केलेल्या टाकळगाव, कानडी बोरगाव येथे बोलताना व्यक्‍त केला.


Comments

Top