लातूर: लातुरहून पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या सर्व जलद रेल्वे गाड्यांना मुरूड व ढोकी येथे थांबा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी रेल्वेचे सोलापूर मंडल प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मल्होत्रा यानी नुकतीच लातूर स्थानकाला भेट दिली. यावेळी शेख यानी हे निवेदन दिले. लातुरहून जाणाऱ्या गाड्याना लातूर नंतर लगेचच हरंगुळ येथे थांबा आहे. त्यानंतर थेट उस्मानाबाद येथेच ही गाडी थांबते. हरंगुळ व लातूर मधील अंतर अत्यंत कमी आहे. शिवाय या स्थानकावरून फारशी तिकिटे विकली जात नाहीत, प्लॅटफॉर्म उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा थांबा बंद करून मुरुड व ढोकी येथे दिला तर मुरुड, ढोकी, कळंब, तांदुळजा तसेच परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे असे निवेदनात म्हटले आहे.
या प्रमुख मागणीसह शेख यांनी इतरही मागण्या केल्या आहेत. लातूर - मुंबई आणि सोलापूर- कोल्हापूर या गाडीला कुर्डूवाडी स्थानकावर अर्धा तास थांबा द्यावा, मिरज - परळी या दैनंदिन गाडीला स्लीपरचे चार डबे जोडावे, लातूर स्थानकावर पार्किंगची व्यवस्था करावी, बीदर- लातूर-मुंबई गाडीला वाढीव आसन क्षमतेचे चार नवे डबे जोडावे, लातूर स्थानकावर चहा, पुस्तके, फळे या साहित्याचे स्टॉल सुरू करावेत,लातूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र ०२ ची लांबी वाढवावी, व्यापाऱ्यांचा माल ठेवण्यासाठी गोदाम बांधावे, तसेच लातूर शहरात रेल्वेच्या मालकीची जागा पडून आहे. या जागेचा व्यावसायिक वापर करावा. यातून रेल्वेचे उत्पन्न वाढेल आदी मागण्यांचे निवेदन निजाम शेख यांनी मंडल प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा याना दिले आहे. झोनल सल्लागार समितीवर फेरनिवड झाल्याबद्दल मंडल प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांनी यावेळी निजाम शेख यांचा सत्कार केला. यावेळी रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
Comments