लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिनांक ०७ ऑक्टोबर २०१८ राजी ८ लातूर येथे विनामूल्य अटल महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन झाले होते. या शिबीरात एक लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. या शिबीराच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ०७ हजार ४०० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरु करुन डिसेंबर २०१८ अखेर पर्यंत सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, वैद्यकीय महाविद्यालयाच डीन डॉ. राजाराम पोवार, आरोग्य उपसंचालक डॉ. माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, डॉ. गिरीष ठाकूर वैद्यकीय निवासी अधिकारी डॉ. माधव शिंदे अदि उपस्थित होते. पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, या ०७ हजार ४०० रुग्णांची विभागणी पाच तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटनिहाय करण्यात यावी. व त्याप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यांनी आप आपल्या गटातील रुग्णांचे पालकत्व घेऊन त्या रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळाल्यानंतर घरी पोहोचविण्याची व्यवस्था करावी. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांचा सर्व खर्च शासन करते. परंतु या व्यतिरिक्त जे रुग्ण असतील त्या रुग्णांचा सीटी स्कॅन व एम.आर. आय. तपासणी खर्च शासकीय नियमाप्रमाणे जो काही होईल तो खर्च आपण स्वत: करणार असून याकरिता विशेष कार्य अधिकारी प्रसाद कुलकर्णी (7020436783) व मनाळे (8329527214) यांच्याशी आरोग्य यंत्रणेने संपर्क ठेवावा.असे त्यांनी सूचित केले.
परंतु कोणत्याही रुग्णांकडून आरोग्य विभागाने एक ही पैसा उपचारासाठी घेता कामा नये याची दक्षता घ्यावी. या सर्व रुग्णांवर पुढील दोन महिन्यात शस्त्रक्रिया पूर्ण कराव्यात. रुग्णांवर शस्त्रक्रिया व इतर औषधोपचार करताना सर्व सामग्री व साहित्य दर्जेदार वापरावे, असे ही पालकमंत्री लंगेकर यांनी सांगितले.
Comments