लातूर: संस्कार हे लहान मुलांवरच करावयाचे असतात असा आपला समज आहे परंतु तो खोटा आहे. काही वेळा मोठ्या माणसांवरही संस्कार करावे लागतात. विस्मृतीत गेलेल्या मूल्यांची त्यांना आठवण करून द्यावी लागते. हे काम पुस्तके करतात, असे प्रतिपादन ख्यातनाम गणितज्ञ तथा लेखिका डॉ. सौ मंगलाताई नारळीकर यांनी केले. लातूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. कुमुदिनी भार्गव यांनी लिहिलेल्या 'चला नाती जपू या' व 'जरा येऊ का मनात' या पुस्तकांचे प्रकाशन सौ. नारळीकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात सौ. नारळीकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. अशोकराव कुकडे काका तर व्यासपीठावर प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, ब्रिजलाल भार्गव लेखिका कुमुदिनी भार्गव यांची उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनात मंगलाताई नारळीकर म्हणाल्या की, आज बदलत्या सामाजिक परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने आपली बलस्थाने शोधून विधायक वृत्ती वाढविली पाहिजे. आज अनेक जण चांगली कामे करीत आहेत पण या कामाचा स्वतःला आनंद देऊ शकत नाहीत. असे का होते? याचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाला हा आनंद मिळाला पाहिजे. आज समाज आणि परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे दोन पिढ्यात अंतर वाढले आहे. या दोन पिढ्यातील नाती जपण्याची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या. पालक आणि मुले यांच्यातील संवाद कमी झाला आहे. पालक मुलांसोबत मौज मजा करतात पण ते परस्परांवर विश्वास टाकतात का? हा प्रश्न आहे. दोघांनीही आपली मने एकमेकांजवळ मोकळी केली पाहिजेत, यासाठी विश्वास असायला हवा. मोठ्या व्यक्तीनी पुढच्या पिढीशी संवाद साधायला हवा. आपण मोठे आहोत, ही जबाबदारी आपलीच आहे, सौ कुमुदिनी भार्गव यांनी लिहिलेल्या पुस्तकातील विचार आनंद देणारे आहेत. ही पुस्तके उद्बोधनाचे काम करतील असे त्या म्हणाल्या.
मनोगत व्यक्त करताना सौ. कुमुदिनी भार्गव म्हणाल्या की प्रा. रवींद्र गोवंडे यांनी मला वेळेवेळी प्रोत्साहन दिले. पन्नालालजी सुराणा यांनी मला लिहायला सांगितलं सामाजिक काम करताना मिळालेलं संचित मध्यस्थ म्हणून पुस्तकाच्या माध्यमातून समोर ठेवले असल्याचे त्या म्हणाल्या.
या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी भार्गव परिवाराच्या वतीने ब्रिजलालजी भार्गव, निकिता भार्गव, शामसुंदर भार्गव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. पुस्तकांचे प्रकाशक सूर्यवंशी, मुखपृष्ठ साकारणारे राजा बोधे, टंकलेखन करणारे श्रीपाद कुलकर्णी यांचा अशोकराव कुकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रकाशक सूर्यवंशी यांनी लेखिका भार्गव यांचा सत्कार केला. या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित असलेले जेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा शामसुंदर भार्गव तसेच दयानंद संस्थेच्या वतीने अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी सत्कार केला. रामानुज रांदड यांनी प्रास्ताविक, सौ प्रीती पोहेकर यांनी संचलन तर चैतन्य भार्गव यांनी आभार प्रदर्शन केले. शुभांगी कुलकर्णी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments