लातूर: राज्यातील शिक्षण संस्थाचालकांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी ०२ नोव्हेंबर २०१८ ला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये शिक्षण संस्था चालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण संस्था चालक महासंघाचे विभागीय अध्यक्ष रामदास पवार यांनी केले आहे.
या बंदच्या संदर्भात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रूपाली चौगुले, शिक्षणाधिकारी (मा.), औदुंबर उकीरडे, शिक्षणाधिकारी (प्रा.) वैशाली जामदार यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी विभागीय अध्यक्ष रामदास पवार, लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाचे सचिव बाबूराव जाधव, उपाध्यक्ष जे.जी. सगरे, सरचिटणीस प्रा. गोविंदराव घार, प्रा. ओमप्रकाश साकोळकर आदिंची उपस्थिती होती.
या निवेदनात म्हटले आहे की, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सरकार शिक्षण संस्था चालकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शिक्षणांवरील खर्च हा बोजा न समजता ती गुंतवणूक समजावी व शिक्षणावर खर्च वाढवावा, ०४ ऑक्टोबर २०१६ रोजी औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीवर काढलेल्या मोर्चातील शिक्षकांवर अमानुष लाठीचार्ज करून दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. संस्थाचालकांनी शाळेवर केलेल्या खर्चाची, निधीची प्रतिपूर्ती (वेतनेत्तर अनुदान) अतिशय तुटपुंजे मिळते. ते पूर्वीसारखेच व प्रचलीत वेतन आयोगानुसार मिळावे आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसाठी ०२ नोव्हेंबरचा बंद असून त्यात शिक्षण संस्थाचालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रामदास पवार यांनी कले आहे. या आंदोलनानंतर देखील दुर्लक्ष केल्यास वा प्रतिसाद न दिल्यास नजीकच्या काळात बेमुदत शाळा बंद आंदेालन करावे लागेल, असा इशाराही शिक्षणाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
Comments