HOME   लातूर न्यूज

लातुरात खुल्या कारागृहाचे उदघाटन

व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे प्रत्येक न्यायालयाने सुनावण्या घ्याव्यात


लातुरात खुल्या कारागृहाचे उदघाटन

लातूर: जिल्हा कारागृहातील बंदी असलेल्या कैद्यांच्या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा जिल्हा कारागृह व प्रत्येक न्यायालयात उपलब्ध आहेत. तसेच लातूर शहर व्यतिरिक्त इतर तालुकास्तरीय न्यायालयात कैदयास हजर करणे अपुऱ्या पोलीस बळामुळे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयाने अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील कालावधीत कैद्यांच्या सुनावण्या व्हिडीओ कॉन्फरसिंग्द्वारे घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.
जिल्हा कारागृहात आयोजित अभिविक्षक सल्लागार मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक जीव्ही पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, अभियंता तावशीकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी दिलीप कारभारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर बनशेळीकर, डॉ. बनसुडे अभिविक्षक सल्लागार मंडळाचे सदस्य अशोक चिंचोले, पार्वती सोमवंशी महापालिका उपायुक्त गायकवाड, अभिविक्षक, कारागृहाचे अधिकारी मधुकर चौधरी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की, जिल्हा कारागृह प्रशासनाने ही प्रत्येक न्यायालयात सुनावणीसाठी कैदी पाठवण्यापूर्वी तेथील प्रशासनाशी व्हीसी द्वारे संबंधित कैदयाची सुनावणी घेण्याबाबत चर्चा करावी. पुढील काळात पोलीस प्रशासनावरील ताण कमी करुन, अद्ययावत तंत्रज्ञान वापरणे व सुरक्षितेच्या दृष्टीने जास्तीत जास्त सुनावण्या व्हीसीद्वारे घ्याव्यात यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
खुले कारागृह उद्घाटन
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण कारागृहानंतर लातूर जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी खुले कारागृह निर्माण करण्यात आले आहे. या कारागृहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. या खुल्या कारागृहात सध्या १० कैदयांना ठेवण्याची परवानगी मिळाली असून हे १० कैदी हे जन्मठेपेची शिक्षा झालेले असून या शिक्षेपैकी त्या कैदयांनी किमान १० वर्षांपेक्षा अधिक शिक्षा प्रत्यक्ष उपभोगलेली असणार आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक पाटील यांनी दिली. कारागृहाच्या कुंपणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती ही त्यांनी दिली.


Comments

Top