HOME   लातूर न्यूज

९० शस्त्रक्रिया पूर्ण, अटल महा आरोग्य शिबिराची फलश्रुती

पहिल्या टप्प्यात ७४३१ रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया, पुण्या-मुंबईत ७४


९० शस्त्रक्रिया पूर्ण, अटल महा आरोग्य शिबिराची फलश्रुती

लातूर: जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे, एकही व्यक्ती पैसे नसल्यामुळे उपचारापासून वंचित राहू नये या उद्देशाने राज्य शासनाने नुकत्याच लातूर येथे घेतलेल्या अटल महा आरोग्य शिबिराची फलश्रुती दिसू लागली आहे. या शिबिरात तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या ७ हजार ४३१ रुग्णांचे पहिल्या टप्प्यात वर्गीकरण करण्यात आले असून विविध रुग्णालयांकडे या रुग्णांना पाठविण्यात येत आहे. शस्त्रक्रियांसाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून यापैकी ९० रुग्णांच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. उर्वरित रुग्णांवरही लवकरच शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती या शिबिराचे सह संयोजक तथा मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी दिली .
लातूर येथे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अटल महा आरोग्य शिबीर पार पडले होते. या शिबिरात ०१ लाख ०३ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यातून जवळपास २७ हजार ८०० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर डॉ. खान यांनी पहिल्या टप्प्यात शस्त्रक्रिया करावयाच्या रुग्णांचे वर्गीकरण केले. यानुसार पहिल्या टप्प्यात ०७ हजार ४३१ शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत .
डॉ खान यांनी केलेल्या वर्गीकरणानुसार ४ हजार ६५४ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्या खालोखाल उदगीर येथील लायन्स रुग्णालयात ०१ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहेत. लातूर येथील एमआयटी रुग्णालयात ९६६ तर सह्याद्री रुग्णालयात १०२ शस्त्रक्रिया होणार आहेत. याशिवाय अल्फा रुग्णालयात ५७, विवेकानंद रुग्णालयात ३९, कँसर रुग्णालयात १५ तर उदगीरच्या लाईफ केअर रुग्णालयात १३ शस्त्रक्रिया होणार आहेत. आतापर्यंत ९० शस्त्रक्रिया पार पडल्या असल्याचेही अभिमन्यू पवार यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात एकही गरीब रुग्ण उपचाराशिवाय राहणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले होते. शिवाय या शिबिरात गरीब, कष्टकरी जनतेला उपचार मिळावेत यासाठी अभिमन्यू पवार यांनी आठवडाभर जिल्ह्याच्या विविध भागात प्रवास करून शिबिराची माहिती गरजूपर्यंत पोचविली होती. त्यामुळेच रुग्णांना शिबिरात सहभागी होता आले. आता गरजूवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यातून कष्टकरी जनतेला मोफत उपचार मिळणार आहेत. शिल्लक राहिलेल्या रुग्णांवर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहेत. जे रुग्ण या शिबिरात उपचार घेऊ शकले नाहीत त्यांना दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिबिरात उपचार घेता येणार आहेत. गरजू रुग्णानी कसल्याही आजाराला न घाबरता उपचार करून घ्यावेत. कितीही खर्च आला तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही अभिमन्यू पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.


Comments

Top