लातूर: दीपावली तोंडावर आली असल्याने सध्या ग्राहक बाजारात खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. नेमका याच संधीचा फायदा घेत ग्राहकांची फसवणूक केली जाऊ शकते, त्यामुळे ग्राहकांनी सावध रहावे. फसवणूक झाली तर ग्राहक संरक्षण समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य दत्तात्रय मिरकले पाटील यांनी केले आहे.
दीपावलीच्या मुहूर्तावर सोने, दैनंदिन गरजेच्या वस्तू, कपडे, वाहने याची खरेदी ग्राहक मोठ्या प्रमाणात करतात. परंतु याचा फायदा घेत अनेकदा निकृष्ट वस्तू विकल्या जातात. मूळ किमतीपेक्षा जादा किमतीने वस्तू विकल्या जातात. वस्तूचा विक्री कालावधी संपला तरी विक्री केली जाते. नामांकित कंपनीचे लेबल लावून बनावट वस्तू विकल्या जातात. पक्की बिले दिली जात नाहीत. अशा माध्यमातून होणारी फसवणूक थांबवायची असेल तर ग्राहकांनी जागृत होणे आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात दुकानदार फसव्या जाहिराती करतात. दूध, खाण्याच्या वस्तू यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होऊ शकते. उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री केली जाते. हे प्रकार थांबले पाहिजेत यासाठी ग्राहकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जागरूक ग्राहकाने भेसळ होत असल्याची माहिती दिली किंवा वजन मापामध्ये असलेला फरक आढळल्यास जिल्हा वजनमापे अधिकाऱ्याकडे किंवा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेकडे तक्रार करावी. यामुळे बाजारपेठेत होत असलेली ग्राहकाची फसवणूक थांबवता येईल. स्वतः ची आणि इतरांचीही फसवणूक थांबवण्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहून अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य आणि जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य दत्तात्रय मिरकले पाटील यांनी केले आहे.
Comments