लातूर: राज्यातील शिक्षण संस्थाचालकांची अनेक प्रश्ने प्रलंबीत आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी शुक्रवार ०२ नोव्हेंबर महाराष्ट्र शैक्षणीक बंदची हाक दिली आहे. या बंदला लातूर शहर व जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याची माहिती शिक्षण संस्थाचालक महासंघाचे विभागीय अध्यक्ष रामदास पवार यांनी शिक्षण संस्था चालकांच्या बैठकीत दिली.
शिक्षण संस्थाचालकांची ही बैठक जयक्रांती महाविद्यालयात बुधवारी झाली. याप्रसंगी लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाचे कोषाध्यक्ष प्राचार्य डी.एन. केंद्रे, सचिव प्राचार्य बाबूराव जाधव, कार्याध्यक्ष डी.बी. लोहारे गुरूजी, सरचिटणीस प्रा. गोविंदराव घार, उपाध्यक्ष जेजी सगरे, सहसचिव पीएन बंडगर, सदस्य राजेंद्र इंद्राळे, एमएस पात्रे यांच्यासह संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवारचा बंद यशस्वी करण्यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात आले. या बंदला मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव बजरंग चोले, जुक्टा संघटनेचे अध्यक्ष प्रा. विलास जाधव, सचिव प्रा. उदय पाटील, अल्पसंख्यांक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष लायक पटेल, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मदन धुमाळ, शिक्षक कॉंग्रेस संघटनेचे अध्यक्ष कालीदास माने, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग चिंचोलकर, सचिव पांडुरंग देडे, अमोल चामे आदी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्याचे रामदास पवार यांनी सांगितले. शुक्रवारच्या बंदमध्ये शैक्षणीक क्षेत्रातील सर्व घटकांनी सामील होऊन हा बंद यशस्वी करावा, असे आवाहनही बंदला पाठिंबा दिलेल्या संघटनांनी केले आहे.
Comments