लातूर : भारत सरकारने सन २०२० पर्यंत गोवर आजारांचे निर्मुलन व रुबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याकरिता टप्प्याटप्प्याने ही लस विविध राज्यांमध्ये लसीकरण कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने माहे नोव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रूबेला लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. तरी लातूर जिल्ह्यातील ०९ महिने व १५ वर्षे गटातील सर्व मुलांना गोवर रुबेला लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी करून आपण स्वतः आपल्या ०४ वर्षे वयाच्या मुलीचे लसीकरण प्रथम शाळेत करून घेणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. गोवर हा आजार लहान मुला मध्ये होणारा अत्यंत घातक आजार आहे. गोवरमुळे मुलांना निमोनिया, मेंदूज्वर, अंधत्व कुपोषण इत्यादी गुंतागुंती होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. रुबेला हा सौम्य प्रकारचा गोवरसारखा विषानुजन्य मुले व प्रोढामध्ये होणारा आजार असला तरी गरोदर मातेला पहिल्या तिमाहित रुबेला हा आजार झाला तर बाळाचा गर्भपात किंवा उपजत मृत्यू होतो आणि बाळ जिवंत जन्मले तरी विविध व्यंग जसे की जन्मत: अंधत्व, बहिरेपणा, जन्मत: ऱ्हदयविकार, लहान मेंदू आणि मतीमंदपणा घेऊन जन्मते.
Comments