HOME   लातूर न्यूज

उज्वला योजनेतून ग्रामीण मतदारसंघातील सर्व गावे धुरमुक्त करणार

रमेशअप्पा कराड यांचा संकल्प; दर्जीबोरगाव येथे उज्वला योजनेतून गॅसचे वाटप


उज्वला योजनेतून ग्रामीण मतदारसंघातील सर्व गावे धुरमुक्त करणार

रेणापुर: गरीब व दुर्बल घटकातील माता-भगीनींचे डोळे व आरोग्य अबाधित राहावेत या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उज्वला योजनेची सुरवात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले असून येत्या काळात लातूर ग्रामीण मतदार संघातील गरजु लाभार्थ्यांना उज्वला योजनेतून गॅस मिळवून देवून सर्व गावे धुरमुक्त करणार असल्याचा संकल्प लातूर ग्रामीणचे भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांनी केला.
रेणापुर तालुक्यातील दर्जीबोरगाव येथे ०२ नोव्हेंबर रोजी ३२ लाख रुपयांच्या विविध विकासाकामांचे भूमीपुजन, लोकार्पण व उज्वला योजनेतून १०१ लाभार्थ्यांना गॅसचे वाटप रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाशराव रेड्डी हे होते. या वेळी जिल्हा परिषदेचे सामाजकल्याण सभापती संजय दोरवे, रेणापूर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे, रेणापुरचे नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, जिल्हा परिषद सदस्य उध्दव चेपट, सुरेश लहाने, रेणापूरच्या तहसिलदार मंजुषा लटपटे, भाजपाचे रेणापुर तालुकाध्यक्ष ॲङ दशरथ सरवदे, उप सभापी अनंत चव्हाण, पं. स. सदस्या संध्या पवार, संगायेचे समितीचे सदस्य श्रीकृष्ण पवार, रेल्वे बोर्डाचे सदस्य निजाम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना रमेशअप्पा कराड म्हणाले, राजकारणाच्या माध्यमातून मी पद व पतिष्ठा मिळवण्यासाठी काम करीत नसून लोककल्याणासाठी निस्वार्थ भावनेतून काम करीत आहे. तळागाळातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यातच माझे समाधान आहे. दर्जीबोरगाव येथे शाश्वत पाणी पुरवठा योजना नसल्याने येथील लोकप्रतिनीधींनी तात्काळ प्रस्ताव तयार करावा, योजना मंजुर करुन आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा. येत्या काळात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून विविध गावांसाठी योजना मंजुर होणार असून अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रेणापूर तालुक्यासाठी ६५ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असून त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. तसेच मुलभूत योजनेतून सहा कोटी रुपयांचा निधी ग्रामीण मतदार संघासाठी लवकरच मिळणार आहे.


Comments

Top