लातूर : वसुंधरा प्रतिष्ठानने अनाथ, निराधार बालकांसोबत लोकसहभागातून दिवाळी साजरी केली. दिवाळीपूर्वीच या अनाथ मुला-मुलींना नवे कपडे मिळावे यासाठी रविवारी विविध ठिकाणी उपक्रम राबविण्यात आला. अनाथ आश्रम, मतिमंद विद्यालये आणि शहरातील दुर्बल घटकांना नवे कपडे आणि मिठाई देऊन आनंदोत्सव साजरा झाला. लोकसहभागातून झालेल्या या दिवाळी उपक्रमातून शहरात मोठ्या प्रमाणात नवे ड्रेस आणि मिठाई वाटप करण्यात आली. अनेक दानशूर व्यक्तींनी या दिवाळी उपक्रमासाठी सहकार्य केले. 'आधी दिवाळी अनाथांच्या अंगणी मग स्वतःच्या घरी' या उपक्रमातून दिवाळी आधी शहरातील अनाथ, निराधार, पर जिल्ह्यातून लातुरात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या लोकांसोबत साजरी करण्यात आली. यावेळी बालकांना नवे कपडे, मिठाई देण्यात आली. शहरातील सावली अनाथालय, शारदा सदन आश्रमशाळा, अनाथ मुलींचे निवासी वसतीगृह येथील बालकांसोबत हा सण साजरा करून त्यांना दिवाळीचा आनंद देण्यात आला. यासोबतच पर्यावरण रक्षण संदेश देण्यासाठी अनाथ बालकांच्या हस्ते त्यांच्या वसतीगृह परिसरात त्यांच्याच नावे वृक्ष लावण्यात आले.
या उपक्रमासाठी लातूरसह विविध जिल्ह्यातील मान्यवरांनी मोलाची मदत केली. त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी असा दिवाळी उपक्रम राबविण्यात आला असून, यासाठी प्रतिष्ठान केवळ माध्यम म्हणून कार्य करीत आहे. अनाथ, निराधार यांच्यासोबत दिवाळी हा मोठा सण साजरा व्हावा, या उद्देशाने सुरू केलेल्या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. या उपक्रमासाठी वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रा. योगेश शर्मा, उमाकांत मुंडलिक, रामेश्वर बावळे, अमोल स्वामी, हुसेन शेख, प्रशांत स्वामी, पवन पाटील, अनिकेत मुंदडा, अमित वेदपाठक, महेश लवटे, राजू शेळके, गोविंद गायकवाड आदींनी विशेष पुढाकार घेतला. गेल्या महिनाभरापासून वसुंधरा प्रतिष्ठानचे सदस्य या उपक्रमासाठी अहोरात्र परिश्रम घेत होते. अनाथ बालकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.
Comments