लातूर: १२ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात पार पडणाऱ्या मुख्यमंत्री चषक स्पर्धेच्या पुर्वतयारीचा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यानी आढावा घेतला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी तयारीला लागावे. आवश्यक ती मदत करून ही स्पर्धा भव्य दिव्य आणि राज्यासाठी मार्गदर्शक ठरावी असे नियोजन करून ती यशस्वी करावी असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर ऑलिंपिक स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला होता. ही बाब त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली. स्पर्धेचे स्वरूप पाहता मुख्यमंत्र्याना ही संकल्पना आवडली. त्यामुळे अशी स्पर्धा राज्य पातळीवर व्हावी अशी सूचना त्यांनी केली. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री चषक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
लातूर दौऱ्यावर आलेले पालकमंत्री संभाजीराव पाटील यांनी स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रथम जिल्हा, विभाग आणि नंतर राज्य पातळीवर स्पर्धा होणार आहे. अंतिम सामना १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती आणि जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून मुंबई येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. या दरम्यान होणाऱ्या रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेत महिला व युवतींचा सहभाग वाढावा यासाठी महिला लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करावेत. स्पर्धेच्या तयारीचा आढावा दररोज विभाग आणि राज्य पातळीवर पाठवावा स्पर्धेच्या माध्यमातुन महिला, युवती व युवकाना संघटनेशी जोडण्याची संधी प्राप्त होणार असल्याने विशेष प्रयत्न करावेत ही स्पर्धा हा देशातील सर्वात मोठा क्रीडा सोहळा असुन लातूर पॅटर्नला साजेशा अशा भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करून त्या यशस्वी कराव्या अशा सूचना त्यांनी केल्या.
अभिमन्यु पवार यांच्या संयोजकांना सूचना
लातूर जिल्हा सध्या भयाण दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. यामुळे सामान्य जनता हवालदिल झाली आहे. या पार्श्वभुमीवर लातूर येथे आयोजित केल्या जाणाऱ्या सी एम चषक क्रिकेट स्पर्धेत मैदानासाठी पाण्याचा वापर टाळावा. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवुन संयोजकांनी पाण्याचा गैरवापर करू नये, अशा सुचना एक लातुरकर नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यानी संयोजकांना केल्या आहेत.
Comments