लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या मालकीचे असलेले गंजगोलाई व गांधी चौकातील व्यापारी संकुलातील गाळयांसाठी रेडिरेकनर पध्दतीनेच भाडे आकारले जाईल. तसेच या गाळयांच्या अनामत रक्कमेबाबत महापालिका प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये सुवर्णमध्य साधून एक फिक्स रक्कम अनामत म्हणून घेण्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे कामगार कल्याण, भूकंप पुर्नवसन ,कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महापालिका व्यापारी संकुतील सोयी–सुविधा व गाळे अनामत रकमेबाबत आयोजित बैठकीत निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर सुरेश पवार, मनपाआयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, तसेच नगरसेवक व सर्व व्यापारी उपस्थित होते. पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, गंजगोलाईला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या गोलाईतील व्यापारी व व्यावसायिकांनी लातूर शहराला व्यापारी शहर म्हणून ओळख निर्माण करुन दिली आहे. या ठिकाणच्या व्यापारी/ व्यावसायिकांना ते पूर्वीपासून व्यवसायधारक असल्याचा विचार करुन गाळे देण्यात येतील. त्याप्रमाणेच व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुस्थितीत कसा राहील याची काळजी ही घेतली जाऊन गंजगोलाई व गांधी चौक व्यापारी संकुलातील सर्व गाळेधारकांना पुढील काळात सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे ही त्यांनी सांगितले.
Comments