HOME   लातूर न्यूज

लातूर जिल्ह्यात दुष्काळ नसल्याचा सरकारचा दावा निषेधार्ह

तात्काळ दुष्काळ जाहीर करून आवश्यक ती मदत देण्याची धिरज विलासराव देशमुख यांची मागणी


लातूर जिल्ह्यात दुष्काळ नसल्याचा सरकारचा दावा निषेधार्ह

लातूर: भाजप शिवसेना सरकारच्या वतीने नुकताच महाराष्ट्रातील १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला मात्र लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंतपाळ या एकाच तालुक्‍यात दुष्काळ आहे. तो देखील मध्यम स्वरूपाचा असे नमूद करून सरकारने दुष्काळाच्या बाबतीत घेतलेला निर्णय जनतेची निराशा करणारा असून लातूर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती नसल्याचा भाजप सरकारचा दावा निषेधार्ह असल्याचे सांगत लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून जनतेला तात्काळ मदत करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी केली.
सध्या लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दुष्काळ असून दिवसेंदिवस दुष्काळाची परिस्थिती अधिकच बिकट होत जाणार आहे. या संदर्भातील सर्व परिस्थिती डोळ्यांसमोर असताना दुष्काळाच्या बाबतीत देखील दुजाभाव होत असल्याची भावना लातूर जिल्ह्यातील नागरिकांची झाली आहे. भरपूर पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने सोयाबीन, मूग, उडीद व अन्य पारंपरिक पिके वाया गेली. रब्बी हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे निराशाजनक ठरला. परतीच्या पावसाची अपेक्षा होती मात्र ती देखील पूर्ण होऊ शकली नाही. अशावेळी तात्काळ उपाययोजना करत भविष्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय पातळीवर पाऊले उचलणे गरजेचे असताना, आता तर चक्क लातूर जिल्ह्यात दुष्काळ नाही असे सरकारने सांगून टाकले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, पालकमंत्री शासकीय अधिकारी अशी यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही? हा मोठा प्रश्न लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे त्यामुळेच पुनश्च एकदा लातूर जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी या कठीण परिस्थितीत आम्ही सोबत आहोत हे कृतीतून दाखवून देण्यासाठी सरकारने लातूर जिल्ह्यात वीज बिल माफ करणे, परीक्षा शुल्कात सूट देणे, हेक्‍टरी आर्थिक मदत करणे अशा विविध उपाय योजना तात्काळ कराव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी केली आहे


Comments

Top