HOME   लातूर न्यूज

पालावर साजरी झाली भाऊबीज

वसुंधरा प्रतिष्ठानकडून नवे कपडे आणि मिठाई देऊन आनंदोत्सव


पालावर साजरी झाली भाऊबीज

लातूर: येथील वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीत रोज एका अनाथालयात उपक्रम राबवून तेथील मुला-मुलींना नवे कपडे, मिठाई देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करून फटाके फोडले. लातूर शहरात परराज्यातून आलेल्या आणि १२ नंबर पाटी येथे पाल ठोकून राहिलेल्यांसोबत भाऊबीज साजरी झाली. यावेळी तेथील चिमुकल्या मुलींकडून ओवाळणी करून त्यांना नवे कपडे आणि मिठाई देण्यात आली.
तीन वर्षांपासून वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने अनाथ, दुर्बल आणि पालावर राहणाऱ्या नागरिकांसोबत लोकसहभागाची दिवाळी साजरी केली जाते. या लोकसहभागाच्या दिवाळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून अनेकजण स्वच्छेने या कार्यात सहभागी होऊन सहकार्य करीत आहेत. वसुंधरा प्रतिष्ठानने यावर्षी दिवाळीत रोज एका अनाथालयात जाऊन दिवाळी साजरी केली. नवे कपडे, मिठाई देऊन अनाथ मुला-मुलींच्या हस्ते पणत्या लावण्यात आल्या. शिवाय, त्यांच्यासोबत फराळ करून फटाके फोडून त्यांना या दिवाळीचा आनंद देण्यात आला. शहरातील सावली अनाथालय, मुलींचे निरीक्षण गृह, शारदा सदन अनाथ आश्रमशाळा आदी ठिकाणी दिवाळी साजरी झाली. शिवाय, लातूर शहरात परजिल्हा आणि राज्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील मिठाई आणि त्यांच्या मुलांना नवे कपडे देऊन दिवाळी साजरी झाली.
गुजरात राज्यातून लातूरला आलेल्या आणि पाल ठोकून राहत असलेल्या भगिनींसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. नवीन कपडे अन मिठाई देण्यात आली. यावेळी या भगिनींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले आणि माणुसकी जिवंत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. या उपक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध गायिका छाया साखरे यांची उपस्थिती होती. या भाऊबीज उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, सोशल मीडिया प्रमुख रामेश्वर बावळे, सदस्य अनिकेत मुंदडा, हुसेन शेख, अमित वेदपाठक आदींनी सहभाग नोंदविला. एकंदरच वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून यंदा दिवाळी अनाथ, दुर्बल, उपेक्षित घटकांसोबत साजरी करून त्यांना माणुसकी जिवंत असल्याची जाणीव करून देण्यात आली. दिवाळी सणात सुटी न घेता सेवेवर कार्यरत राहून जनतेची सेवा करणाऱ्या एसटी वाहक-चालक आणि पोलीस बांधवांचा वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.


Comments

Top