HOME   लातूर न्यूज

टंचाई काळासाठी महावितरणने सूक्ष्म आराखडा तयार करावा

-पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची आढावा बैठकीत सूचना


टंचाई काळासाठी महावितरणने सूक्ष्म आराखडा तयार करावा

लातूर: टंचाई काळात राज्य वीज वितरण कंपीनीच्या डीपी नसणे, डीपी करिता ऑईल नसणे व वीज पुरवठा खंडित होणे या कामांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संभाव्य टंचाई कृती आराखडयाप्रमाणे वीज विभागाचा सूक्ष्म आराखडा स्वतंत्रपणे सादर करावा, असे निर्देश कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, आत्मा प्रकल्प संचालक डी. जाधव, आदिसह सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, राज्य वीज वितरण विभागाने जिल्हयातील सर्व पायाभूत सुविधांच्या कामांची माहिती घ्यावी. टंचाई काळात ज्या गोष्टी प्राधान्याने करणे गरजेचे आहे अशा कामांचा सूक्ष्म आराखडा तयार करुन त्या कामांना अधिक प्राधान्य दयावे, जेणे करुन नागरिकांना वीज विभागाकडून योग्य व वेळेत सेवा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करु नये, असे त्यांनी सूचित केले.


Comments

Top