लातूर: जिल्हयात २७ नोव्हेंबर २०१८ पासून गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविली जात असून याअंतर्गत ०९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना गोवर-रुबेला लस देण्यात येणार आहे. त्याबाबत जनजागृती होण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ७.३० वाजता आयोजित एमआरथॉन पालक-बालक रॅलीत सर्व नागरिक व त्यांच्या पाल्यांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित गोवर-रुबेला लसीकरण मोहिम आढावा बैठकीत श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी, जी. श्रीकांत, पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक संजय ढगे व जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांच्यासह इतर यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या ०९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना गोवर रुबेलाचे लसीकरण करावे. त्यामुळे मुले भविष्यात या आजारांपासून दूर राहतील. तसेच आरोग्य विभागाने १८ नोव्हेंबर २०१८ रोजी एमआरथॉन पालक-बालक या जनजागृतीवर रॅलीचे आयोजन केलेले आहे. त्या रॅलीस आपण स्वत:मुलांसह उपस्थित राहणार असून सर्व यंत्रणांना प्रमुखांनी स्वत: व अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यासह उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
Comments