लातूर: ‘देश की ताकत हम सब बच्चे’ जोडो भारत जोडो भारतचा नारा देत थोर समाजसेवक डॉ. एस. एन. सुब्बाराव यांचे लातूरच्या रेल्वे स्थानकावर शुक्रवारी लातूरकरांनी जोरदार स्वागत केले. विलासराव देशमुख फाऊंडेशन संचलित गोल्ड क्रेस्ट हाय व नवी दिल्ली राष्ट्रीय युवा योजनेच्या वतीने १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान गोल्डक्रेस्टच्या प्रांगणात राष्ट्रीय बालआनंद महोत्सव होत आहे. दरम्यान, या महोत्सवासाठी गांधीवादी नेते डॉ. सुब्बाराव यांचे रेल्वे स्थानकावर स्वागत झाले. यावेळी डॉ. सुब्बाराव यांनी ‘एक दुलारा देश हमारा’ ‘नौजवान आओ रे नौजवान गाओ रे’ ही प्रेरणा गीते सादर केली. त्यावेळी रेल्वेस्थानकावरील वातावरण भारावून गेले. तद्नंतर हा जत्था गांधी चौक येथे पोहोचला. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या महोत्सवाला प्रारंभ होण्यापूर्वीपासून लातूरकरांनी भरभरून प्रेम दिले. परराज्यातून आलेल्या मुला-मुलींचे पालकांनी आपल्या घरी पारंपरिक स्वागत केले. शहरातील ४०० पेक्षा अधिक कुटुंबांमध्ये देशाच्या १८ राज्यांमधून आलेली मुले-मुली सहा दिवस वास्तव्याला राहणार आहेत. हा एक आगळा वेगळा प्रयोग असून, ज्यामुळे सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता वृंद्धीगत होणार आहे. दरम्यान, गोल्डक्रेस्ट हाय प्रांगणामध्ये महोत्सवाची तयारी झाली असून, २२ दालने उभारली आहेत. केरळ व कर्नाटक येथून लातूरच्या बालमहोत्सवासाठी निघालेल्या मुला-मुलींना कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सदिच्छा दिल्या़ प्रवासातील बालकांना भेटून चर्चा केली व भाषाभेद, प्रांतभेद विसरून राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.
गोल्डक्रेस्ट हायचे प्रांगण सजले...
राष्ट्रीय बालआनंद महोत्सवासाठी गोल्डक्रेस्ट हायचे प्रांगण सजले आहे. २२ दालनांमध्ये संगीत, चित्रकला, कोलाज, वैज्ञानिक प्रयोग तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम होणार आहेत. यावेळी देशाच्या विविध प्रांताची भाषा, वेशभूषा, खाद्यसंस्कृती आणि विविधतेतील एकतेचा परिचय मुलांना होणार आहे. दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार्या उद्घाटन सोहळ्यास तसेच दुपारी ४.०० वाजता क्रीडासंकुल येथून निघणार्या राष्ट्रीय एकात्मता रॅलीस व सायंकाळी ५.०० च्या राजर्षी शाहू महाविद्यालातील भारत की संतान कार्यक्रमास लातूरकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख व संयोजन समितीने केले आहे.
Comments