लातूर: निसर्गावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय अडचणीत येत आहे. ही बाब लक्षात घेवून केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांनी एकत्रित येवून गटशेती किंवा अॅग्रो कंपन्या उभ्या कराव्यात असे धोरण जाहीर केलेले आहे. या धोरणानुसार राज्यात अॅग्रो कंपन्या उभारल्या गेल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत भर पडून शेतीला उद्योगाचा दर्जा मिळेल असा विश्वास राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.
निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत होगाडे अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्यावतीने उभारण्यात आलेल्या गोदाम व खरेदी केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदचे अध्यक्ष मिलींद लातूरे, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, कृषी सभापती बजरंग जाधव, निलंगा पंचायत समितीचे सभापती अजित माने, उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे, चेअरमन दगडू साळुंके, कृषी उपाधीक्षक मोरे, कृषी अधिकारी नाबदे, मधुकर मल्लिकार्जुन होगाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांचे हित साधून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना सुरू करण्यात आले असल्याचे सांगून पालकमंत्री निलंगेकर यांनी या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. या योजनेचा एक भाग म्हणून केंद्र व राज्य शासनाने ऍग्रो प्रोड्युसर कंपन्या उभा करण्याचे धोरण जाहीर केलेले आहे. या धोरणानुसार शेतकऱ्यांनी एकत्रित येवून ऍग्रो कंपन्या सुरू करून आपल्या उत्पादीत मालाचे मार्केटींग करून थेट लाभ मिळविण्यास कोणतीच अडचण येणार नाही, अशी माहिती पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी दिली. यापूर्वी बाजार समित्या व वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाची खरेदी विक्री होत होती. विशेष म्हणजे यामध्ये दलालांचाही समावेश असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी अल्पदर पडत होता. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली जात होती. ही बाब लक्षात घेवून ऍग्रो कंपन्या उभारण्यासाठी शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. या अॅग्रो कंपन्या शेतकऱ्यांच्याच मालकीच्या असल्या तरी त्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी स्पष्ट केले.
Comments