लातूर-मुंबई: हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अमित देशमुख यांनी काल रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत भेट घेतली. प्रलंबित असणाऱ्या प्रकल्पाच्या बाबतीत सकारात्मकतेने विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सध्या सुरु असलेल्या अधिवेशनानंतर लगेचच जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचेही मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.
राज्य शासनाने अलिकडे १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यानंतर मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करुनही लातूर जिल्ह्यातील साधारणपणे २० टक्के भागात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. जिल्ह्यात झालेले अत्यंत कमी पर्जन्यमान लक्षात घेता जिल्हाभरात सरसकट दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच मराठवाड्याच्या वाट्याला आलेले कृष्णा खोऱ्यातील पाणी प्रत्यक्षपणे उपलब्ध करुन देण्यासाठी सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी आणि या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी लागणारा मोठा निधी लक्षात घेता कृष्णा-मराठवाडा पाटबंधारे प्रकल्पाच्या कामांसाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करुन घेण्यात यावा आणि हा प्रकल्प केंद्रीय प्रकल्प म्हणून राबवावा अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली आहे.
लातूर शहर आणि आसपासच्या परिसरात यावर्षी भीषण पाणी टंचाई जाणवणार आहे. सध्या सुरु असलेल्या कृष्णा-मराठवाडा पाटबंधारे प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी अधिक कालावधी लागणार असल्यामुळे तातडीचा उपाय म्हणून उजनी ते धनेगाव दरम्यान केवळ पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात यावी आणि सध्या उपलब्ध असलेल्या धनेगावपासून हे पाणी लातूरपर्यंत देण्यात यावे या विशेष मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लातूर जिल्हा रुग्णालयासाठी यापूर्वीच आमदार देशमुख यांनी सध्या कृषी विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीची मागणी केली आहे. हा प्रश्न सध्या शासनाच्या विचाराधीन असून शेवटच्या टप्प्यात आहे. याबाबत लवकरच आशादायी चित्र निर्माण झालेले दिसेल असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. लातूर येथील जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणाची जुनी मागणीही प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाचे प्रशासन आणि लातूर बार कौन्सिल यांनी सध्याचे न्यायालय तसेच अशोक हॉटेलजवळ असणारी जुन्या विश्रामगृहाची जागा यासाठी मिळण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत सकारात्मकतेने विचार करुन अडचणी दूर केल्या जातील आणि ही जागा विधी व न्याय विभागाकडे जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी सुपूर्द केली जाऊ शकेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
लातूर येथील औद्योगिक वसाहतीचे तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात विस्तारीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देवू केल्या आहेत. जमिनीचे दर निश्चित करुन भूसंपादनाचे काम लवकरात लवकर करावे आणि लघु आणि मध्यम उद्योगांसाठी जमिनी देवून औद्योगिकरणाला गती द्यावी अशी मागणीही देशमुख यांनी केली. पंतप्रधानांच्या उडान योजनेनुसार लातूर विमानतळावरून विमान वाहतूक सुरु करण्यासाठी काही कामांची पूर्तता करणे आवश्यक आहे. या विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध केल्यास मेडिकल इमर्जन्सीसाठीही हे विमानतळ २४ तास उपलब्ध होऊ शकेल अशी मागणीही आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लातूर बाह्यवळण रस्त्यासाठी पुरेसा निधी दिला जाईल आणि लातूर शहरातील ओव्हरहेड विद्युत तारांचे भूमिगत विद्युत तारांत रुपांतर करण्याच्या योजनेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.
Comments