HOME   लातूर न्यूज

सिद्धेश्वर देवस्थान उभारणार चारा छावणी- विक्रम गोजमगुंडे

धर्मादाय आयुक्तांच्या आवाहनास देवस्थानचा सकारात्मक प्रतिसाद


सिद्धेश्वर देवस्थान उभारणार चारा छावणी- विक्रम गोजमगुंडे

लातूर: मराठवाड्यातील अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना स्वतःचे पशुधन सांभाळणे जिकीरीचे झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी राज्यातील मंदिर व देवस्थान यांनी पुढाकार घेऊन चारा छावण्या उभारण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानाने सकारात्मक प्रतिसाद देत यावर्षी चारा छावणी सुरू करणार असल्याचे घोषित केले आहे.
लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान सातत्याने सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहत आलेली आहे मागील दोन वर्षापूर्वीही सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने चारा छावणी उभारण्यात आली होती. या चारा छावणीस देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनीही भेट दिलेली होती, त्यावेळी चारा छावणी उभारणारे सिद्धेश्वर देवस्थान हे राज्यातील एकमेव देवस्थान ठरले होते.
या वर्षीही धर्मदाय आयुक्तांच्या आवाहनास प्रतिसाद देत देवस्थानच्या वतीने देवस्थान परिसरामध्ये चारा छावणी उभारण्यात येणार आहे सर्व निकषांची पूर्तता करून पात्र शेतकऱ्यांना चारा छावणीमध्ये आपले पशुधन जोपासण्याची पूर्ण व्यवस्था व चाऱ्याची व्यवस्था देवस्थानाच्या वतीने करण्यात येणार आहे. याबाबत देवस्थान कमिटीने धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्याशी व्यक्तिशः चर्चा करून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली. लातूर व परिसरातील शेतकरी पशुधनाच्या जोपासण्याकरिता चिंतेत असताना देवस्थानाच्या या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. देवस्थान कमिटीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या चारा छावणीमध्ये पशुधन जोपासणीसह शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे व चाऱ्याची व पाण्याची पूर्णतः सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, सचिव अशोक भोसले, विश्वस्त सुरेश गोजमगुंडे, सुरेंद्र पाठक यांनी दिली.


Comments

Top