लातूर : विलासराव देशमुख फाउंडेशन आणि राष्ट्रीय युवा योजना नवी दिल्लीच्या वतीने आयोजित गोल्डक्रेस्ट हायच्या प्रांगणात सुरु असलेल्या १९ व्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवासाठी आलेल्या देशभरातील १८ प्रांतातील बालक बुधवारी विज्ञान प्रयोगामध्ये रमले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांमध्ये वैज्ञानिक जाणिव जागृती करण्यात आली.
राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाच्या चौथ्या दिवशी डॉ. कल्पना चावला, विज्ञान केंद्र सातारा येथील संचालक डॉ. संजय पुजारी यांचा ‘विज्ञान के चमत्कार’ हा कार्यक्रम झाला. यावेळी देशभरातील विविध प्रातांतील बालकांनी सहभाग नोंदविला. ‘भारताची अंतराळ संशोधनात प्रगती’ या विषयावर सहभागी मान्यवरांनी बालकांना माहिती देण्यात आली. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. कलाम, डॉ. कल्पना चावला यांच्यासह विविध वैज्ञानिकांच्या जिवन चरित्रावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. आपणही वैज्ञानिक होवू शकतो, असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये डॉ. पुजारी यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हवेचा, द्रवाचा दाब आणि गुरुत्वीय शक्ती यांच्या संकल्पनेतून विविध प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. एखाद्या प्रयोगाविषयी मुलांच्या मनात असलेले कुतूहलाची भावना समजून घेतली पाहिजे. त्यांना पडणाºया प्रश्नांची उकल प्रयोगातून सोडविता येते, हाच संदेश डॉ. संजय पुजारी यांनी दिला.
३० मिनिटात क्षेपणास्त्र...
बाल आनंद महोत्सवात सहभागी झालेल्या बालकांनी केवळ ३० मिनिटामध्ये क्षेपणास्त्र तयार केले. त्यानंतर त्याचे विविध प्रयोग प्रत्यक्ष करुन अनुभूती घेतली. प्रत्येक बालक हा वैज्ञानिक असतो, केवळ त्यांच्यातील जिज्ञासा, प्रश्न विचारण्याच्या वृत्तीला वैज्ञानिक आधार दिला पाहिजे. यातूनच भविष्यातील वैज्ञानिक तयार होईल. अशा जिज्ञासू वृत्तीच्या विद्यार्थ्यांच्या हातून विविध प्रयोग उदयाला येतील, असेही डॉ. पुजारी म्हणाले.
एक हजार बालक बनले वैज्ञानिक...
बाल महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या बालकांना क्षेपणास्त्र तयार करण्यापासून ते अवकाशात सोडण्यापार्यंतचे सर्वच प्रयोग यावेळी प्रशिक्षणातून दाखविण्यात आले. या प्रयोगासाठी बालकांच्या हाती साहित्य देण्यात आले. याबाबत क्षेपणास्त्र कसे तयार करावे? याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी काही टिप्सही सांगण्यात आले. दरम्यान, एक हजार बालकांनी अवघ्या ३० मिनिटामध्ये रॉकेट तयार केले. हे रॉकेट अंतराळात कसे पाठवायचे याचे प्रयोग बालकांनी केले. महोत्सवातील बालके ‘विज्ञानमय’ वातावरणात रंगले होते.
Comments