HOME   लातूर न्यूज

सर्व धर्मांची शिकवण मानवी कल्याणासाठी- डॉ. एसएन सुब्बाराव

राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचा समारोप


सर्व धर्मांची शिकवण मानवी कल्याणासाठी- डॉ. एसएन सुब्बाराव

लातूर: भारत देश विविध जात-धर्म-पंथाने जोडलेला आहे. सर्व धर्माच्या संस्थापकांनी जगाला दिलेले तत्वज्ञान व शांततेचा संदेश मानवाच्या हितासाठी आहे. त्यामुळे सर्वधर्माची शिकवण मानवी कल्याणासाठी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय युवा योजनेचे संचालक डॉ. एसएन सुब्बाराव यांनी राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाच्या समोराप कार्यक्रमात व्यक्त केले.
विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि राष्ट्रीय युवा योजना नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव गोल्डक्रेस्ट हायच्या प्रागंणात मागील चार दिवसांपासून सुरु आहे. त्याचा समारोप गुरुवारी झाला. यावेळी मंचावर गोल्डक्रेस्ट हायचे प्राचार्य एके कपूर, डॉ. बीएस वाकूरे, प्राचार्य टीएस दाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. सुब्बाराव म्हणाले, जगातील प्रत्येक धर्माच्या धर्मगुरुंनी मानवतेच्या कल्याणासाठी शांततेचा संदेश दिला. त्याच मार्गाने प्रत्येकाने यशस्वीपणे वाटचाल करायला हवी. माणसाने दिवसाच्या सुरुवातीला आळस, मी चुकीचा नाही तर चारित्र्यवान आहे असा विचार केला तर निश्चीतच जीवन चैतन्यमय झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवासाठी देशभरातील विविध १८ राज्यातून आलेली बालके ही भारत मातेची वीर सुपुत्र आहेत. उद्याच्या उज्वल भारताच्या विकासाचे ते पाईक आहेत. या बालकांच्या हातून सुंदर भारताचे निर्माण होणार आहे. आपल्या सर्वांना एकत्र येऊन भारत देश जोडायचा आहे. ज्यावेळी आपण सगळे मिळून समृद्ध भारत निर्माण करु तेव्हाच या बाल आनंद महोत्सवाची यशस्विता आपल्याला दिसेल. शांतता ही संपूर्ण जगाला प्रेमाचा संदेश देत आहे. दैनंदीन जीवनात कोणतेही कार्य करत असताना दुसऱ्‍याचा फायदा केल्यास किंवा इतरांचा विचार केल्यास तुम्हाला पुण्य नक्कीच मिळेल, त्यामुळे इतरांची सेवा करण्याचा संदेश त्यांनी उपस्थित बालकांना दिला.


Comments

Top