औसा: मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी औसा तालुक्यातील आशिव येथे नैसर्गिक शेतीची पाहणी केली कुंभारे यांच्या शेतातील पीक आणि फळबागांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. पवार यांनी औसा तालुका दौऱ्यात आशिव येथे अशोक कुंभारे व तमणप्पा कुंभारे यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीची पाहणी केली. शिवार फेरी करून पिके व फळबागांची माहिती घेतली. रासायनिक खते वापरुन केलेली शेती व नैसर्गिक शेती यामधील फरक समजुन घेतला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, संतोषअप्पा मुक्ता, नगरसेवक किरण उटगे, कारखान्याचे माजी संचालक सुभाष जाधव, संजय कुलकर्णी, बालाजी सुर्यवंशी, सरपंच गोविंद मदने, उपसरपंच रमाकांत वाळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर अभिमन्यू पवार म्हणाले की, औसा तालुका हा विविध कारणांनी संकटात सापडला होता. भूकंप आणि दुष्काळ यामुळे या भागातील शेतकरी अडचणीत सापडला होता. या अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. दुष्काळ आणि पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी नैसर्गिक शेती हा उत्तम पर्याय आहे. यातून शेतकरी समृद्ध होऊ शकतो. शासनही याला प्रोत्साहन देत आहे. यासंदर्भात असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यास आपल्याला आवडेल असे ते म्हणाले.
Comments